राज्य शासनाचा निर्णय ः ग्रामपंचायच कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

अरुण गुरव
Thursday, 17 September 2020

राज्य शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनामध्ये वाढ केली असून, तशी अधिसूचना लागू केली आहे. 

मल्हारपेठ ः शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनामध्ये वाढ केली असून, तशी अधिसूचना लागू केली आहे. त्यामुळे पाटण तालुक्‍यातील सुमारे 500 कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती पाटण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष संभाजी कांबळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतन दरामध्ये वाढ करून शासनाने 10 ऑगस्टपासून अधिसूचना लागू केली आहे. ग्रामपंचायत परिमंडळे व कर्मचाऱ्यांच्या वर्गवारीनुसार दरमहा रक्कम 11 हजार 625 ते 14 हजार 125 असे किमान वेतनातील मूळ दर जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे पाटण तालुक्‍यातील सुमारे 500 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. 
किमान वेतन दर यापूर्वी ऑगस्ट 2013 मध्ये जाहीर केले होते. किमान वेतन कायद्यानुसार पाच वर्षांनी वाढ करणे आवश्‍यक होते. मात्र, शासनाने वाढ केली नव्हती. मागील दोन वर्षे महासंघ व जिल्हा संघाने विधानसभा अधिवेशनवेळी मोर्चे काढले, धरणे आंदोलने केली. साताऱ्यात जिल्हा परिषदेवर निदर्शने व जेलभरो आंदोलने केली. कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या आंदोलनाची दखल घेत सल्लागार मंडळाने किमान वेतन मुळदरातील दरावर वाढ करून शिफारशींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. 
राज्य शासनाच्या ऊर्जा, उद्योग व कामगार विभागाने किमान वेतन सल्लागार मंडळाच्या शिफारशींच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. सुधारित किमान वेतन दर लागू झाले असून, कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. 

किमान वेतनाची अंमलबजावणी करा 
राज्य शासनाने जाचक अटी रद्द करून अनुदानाची तरतूद करावी व किमान वेतनाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महासंघाचे राज्याचे सचिव श्‍याम चिंचणे व जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष नांगरे, योगेश चव्हाण, धनंजय कदम यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 

संपादन ः संजय साळुंखे 

 

साताऱ्यातील जम्बो हॉस्पिटलवर शुक्लकाष्ठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara State Government's decision: Salary increase for Gram Panchayat employees only