सातारा : कृषिपंपांचे कनेक्शन तोडण्याचा धडाका

तारळे विभागात महावितरणचा कारवाईचा बडगा शेतकरी अडचणीत
MSCB  Electricity
MSCB Electricitysakal

तारळे: शेतकऱ्यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपता संपेना, अशी चिन्हे आहेत. दोन वर्षे झाली अतिवृष्टी, कोरोना महामारीतून सावरू लागलेला शेतकरी पुन्हा कारवाईच्या फेऱ्यात आहे. विविध कारणांनी अडचणीत येऊन आर्थिक कोंडी झालेल्या बळीराजाने महावितरणच्या धडक कारवाईचा धसका घेतला आहे. थकीत वीजबिले असणाऱ्या कृषीपंपांची वीज तोडायचा सपाटा लावला आहे. एका दिवसात सुमारे ५० हून अधिक शेतकऱ्यांवर कारवाई करत कनेक्शन तोडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

तारळे विभागात नदीच्या बारमाही पाण्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. ऊस, आले, हळद, भाजीपाला पिकांनी शिवारे हिरवीगार झाली आहेत. कृषीपंपांच्या साहाय्याने दोन-चार किलोमीटर पाइपलाइन करून शेतकऱ्यांनी पाणी शिवारात नेले आहे. त्यासाठी विजेचा मोठा वापर होत असतो. शेतकरीदेखील वेळच्यावेळी वीजबिले भरत आला आहे. मात्र, गत दोन वर्षांत पूर, अतिवृष्टी व कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आर्थिक चणचणीमुळे शेतकऱ्यांची बिले थकली, तर शासनाच्या वीजबिल माफीच्या धरसोड वृत्तीने काहींनी बिले थकवली.

महावितरणच्या थकीत वीजबिलांमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. थकीत बिलाच्या ओझ्याखाली कंपनी दबली आहे. शेतकऱ्यांना थकीत बिले भरण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले. शिवाय ५० टक्के रक्कमदेखील माफ केली आहे. मात्र, तरीही काही शेतकरी थकबाकीदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांचाही नाईलाज झाल्याने वरिष्ठ पातळीवरून थकीत वीजजोडण्या तोडण्याचे आदेश निघाले असून स्वतः वरिष्ठ अधिकारी फिल्डवर उतरून कारवाई करीत आहेत.

तारळे भागात सुमारे १,२०० कृषीपंपांच्या जोडण्या आहेत. त्यातील पन्नास टक्के थकीत असून त्यातील काहींनी थोडी फार रक्कम भरली आहे. मात्र, २५० च्या सुमारास पूर्ण थकीत शेतकरी आहेत. अशांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे बळीराजाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com