कोरेगावातील "जलयुक्त शिवार'मधील यश मैलाचा दगड, कीर्ती नलावडे

Satara
Satara

कोरेगाव (जि. सातारा) : प्रशासकीय सेवेतील 21 वर्षांच्या कार्यकाळामध्ये कोरेगाव तालुक्‍यात दहा वर्षांपूर्वी तहसीलदार आणि आता प्रांताधिकारी म्हणून एकूण सहा वर्षे काम केले. जलयुक्त शिवार अभियानामध्ये तालुक्‍याने राज्यपातळीवर यश हे माझ्यासाठी प्रशासकीय सेवेतील मैलाचा दगड होय. प्रशासनाच्या माध्यमातून या तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देता आल्याचे मनापासून समाधान आहे, असे प्रतिपादन मावळत्या प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी केले. 

सातारा येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर येथील पदभार सोडण्यापूर्वी त्यांनी ही माहिती दिली. कोरेगाव तालुक्‍यामध्ये जलयुक्त शिवार, पाणी फाउंडेशन, टॅंकरमुक्ती, पाणंद रस्त्यांची कामे लोकप्रतिनिधी, नागरिक आणि महसूल प्रशासनाने मिळून पूर्ण केली. जलयुक्त शिवार अभियानामध्ये तालुक्‍याने राज्यपातळीवर संपादन केलेले यश, हा माझ्यासाठी प्रशासकीय सेवेतील मैलाचा दगड आहे. पाण्याबाबत स्वयंपूर्ण झालेल्या जायगावसारख्या गावाची राज्याने दखल घेतली आणि अनेक गावे पाणीदार झाली. तालुक्‍यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाच्या सहकार्याने विविध गुन्ह्यांतील सराईतांवर तडीपारीची प्रभावीपणे कारवाई केली.

दारूबंदीचे खटले जलदगतीने चालवून दोषींवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केल्याने अनेक गावांतील दारूधंदे बंद झाले आहेत. सातबारा संगणकीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात आले, काही ठिकाणच्या अडचणीमुळे काम रखडले असले तरीही कोरेगाव तालुका जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तीन वर्षांच्या कार्यकाळामध्ये हाताळलेल्या लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एका निवडणुकीची प्रक्रिया प्रशासकीय यंत्रणांच्या साह्याने शांततेत पार पडली. कोरोनाच्या संकटामध्ये तालुक्‍यात प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागाकडून चांगले काम झाले आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍याने रक्षक क्‍लिनिक, सुसज्ज कोरोना केअर सेंटर, होम आयसोलेशन आदी उपक्रम सुरू केले. ग्रामपातळीपासून एकत्रितपणे चांगले काम झाल्याने कोरोनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढू दिला नाही. आतापर्यंत आढळलेल्या 378 बाधितांपैकी 331 जण बरे झाले आहेत. दुर्दैवाने 11 जणांचा मृत्यू झाला असून, सध्या 88 जण उपचार घेत आहेत आणि त्यापैकी 39 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

तालुक्‍याच्या विकासासाठी पूरक ठरणाऱ्या सातारा-म्हसवड-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते. जनतेतून आलेल्या तक्रारींबाबत संबंधितांची बैठक व आवश्‍यक तेथे लोकांच्या मागणीप्रमाणे आराखड्यात बदल करायला लावल्याने महामार्गाचे काम मार्गी लागले आहे. पुणे-मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचेही काम रखडले होते. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन रेल्वेचे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या. शेतकऱ्यांचे प्रश्‍न समजून घेऊन सन्मानजनक तोडगा काढता आल्याने आता तालुक्‍यातील लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम 
मार्गी लागल्याचे नलावडे यांनी नमूद केले. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com