पारधी समाजातील कल्याणने साधला यशाचा लक्ष्यभेद!

सुनील शेडगे 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

जिद्द अन्‌ प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत यामुळे कामट्याची सहा वर्षांपूर्वी शासनाच्या क्रीडाप्रबोधिनी उपक्रमात निवड झाली. त्याच वेळी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी मंगल सोनावले यांनी त्याचे कल्याण असे नामकरण केले. 

नागठाणे (जि. सातारा) : शिक्षक दांपत्याने स्वतःच्या घरी आणून बालपणापासून पालनपोषण केलेल्या पारधी समाजातील कामट्या ऊर्फ कल्याणने दहावीच्या परीक्षेत यशाचा तुरा खोवला आहे. त्यातून खेळाबरोबरच त्याच्या शिक्षणाची वाटही सुलभ बनली आहे. 

कामट्या (कल्याण) लक्ष्मण पवार हा फत्त्यापूरचा. पारधी समाजातील. आई-वडिलांची सततची भटकंती. तो जात्याच अत्यंत काटक, चपळ. पहिलीत असतानाच त्याच्यातील हे नैसर्गिक गुण त्याचे शिक्षक युवराज कणसे यांनी ओळखले. त्यांनी कामट्यावर लक्ष केंद्रित केले. त्याला आपल्यासोबत घरी आणले. कणसे यांच्या पत्नी संगीता याही प्राथमिक शिक्षिका. या कुटुंबाने कामट्याला आपल्याच घरातील घटक मानले. त्याची जिद्द अन्‌ प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत यामुळे कामट्याची सहा वर्षांपूर्वी शासनाच्या क्रीडाप्रबोधिनी उपक्रमात निवड झाली. त्याच वेळी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी मंगल सोनावले यांनी त्याचे कल्याण असे नामकरण केले. सध्या तो कोल्हापूर येथे प्रशिक्षण घेतो. त्याच्या शिक्षण, खेळाच्या खर्चाचा भार शासनातर्फे उचलला जातो.

कुस्तीमध्ये त्याने प्रावीण्य संपादन केले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साकरे, राम सारंग, कृष्णा पाटील, प्रवीण कोंढावळे, जितेंद्र कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कित्येक स्पर्धा गाजविल्या आहेत. राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदकही पटकावले आहे. हे करताना तो इस्कुर्ली (जि. कोल्हापूर) येथील जय हनुमान हायस्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिकत होता. राजाराम चौगुले, साताप्पा पाटील या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने 70 टक्के गुण मिळवत यश पटकावले. त्यामुळेच पारधी पोराचे यश हा सर्वत्र कौतुकाचा विषय बनला आहे. 

कणसे गुरुजींची उत्सुकता 

निकालाच्या दिवशी स्वतःच्या मुलांपेक्षा कामट्याच्या निकालाची उत्सुकता कणसे गुरुजींना अधिक होती. कामट्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला, हे समजताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनीही फोन करून गुरुजींचे अभिनंदन केले. अंगापूर परिसरातूनही कामट्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संपादन : पांडुरंग बर्गे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Success Of Students From Pardhi Community In Class X Examination