
दोन टोळीतील सर्वांनाच हद्दपार करण्याबाबत जनतेतून मागणी होत होती. प्रस्तावित दोन्ही टोळीमधील सात जणांना हद्दपार करावे, अशी मागणी उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. त्यावर चौकशी व सुनावणी होऊन दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण पोलिस अधीक्षकांनी दोन टोळ्यातील सात जणांना तडीपार केले आहे.
सातारा : उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या दोन टोळ्यांतील सात जणांना साताऱ्याचे एसपी अजयकुमार बन्सल यांनी आज तडीपार केले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे दहशत पसरविणा-या व समाजात बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या टोळ्यांविरूध्द तडीपारची कारवाई सुरुच राहणार असल्याचे एसपी अजयकुमार बन्सल यांनी सांगितले आहे.
उंब्रज व पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, मोठी दुखापत, दरोडा, गर्दी मारामारी करणारे टोळीचा प्रमुख संदीप भानुदास भिंताडे (वय २५, रा. जाळगेवाडी, ता. पाटण), सागर उर्फ बंडा शंकर गायकवाड (वय २७, रा. उंब्रज, ता. कराड), सोन्या उर्फ शाहिद शब्बीर मुल्ला (वय २२, रा. उंब्रज), रोशन उर्फ रोशा अरविंद सोनावले (वय २१, रा. उंब्रज) यांची टोळी तयार झाली होती. या टोळीने अनेक गुन्हे केल्याने यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांचे कारमाने सुरूच होते. यापूर्वी २०१९ मध्ये त्यांना सहा महिने सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले होते. पण हद्दपारीचा कालावधी संपताच त्यांनी पुन्हा दोन गंभीर गुन्हे करुन समाजात दहशत, भीतीचे वातावरण निर्माण केले होते. या टोळीतील चार जणांना सातारा तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगांव, वाळवा, शिराळा तालुक्यातुन एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते.
डिस्कळ येथील कारखान्यास आग; लाखाेंचे नुकसान
तसेच उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, खंडणी, विनयभंग, दुखापत मारामारी, शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या टोळीचा प्रमुख रणजित नथुराम सरगर (वय २३, रा. वाघेश्वर, ता. कराड) अक्षयउर्फ आप्पा अंकुश लोखंडे (वय २४, रा. संजयनगर मसुर, ता. कराड), धीरज रघुनाथ जाधव (वय ३०), रा. वाघेश्वर, मसुर, ता. कराड) यांना सुधारण्याची संधी देऊन तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. सर्वसामान्य जनतेस त्यांचा उपद्रव सुरूच होता. या दोन टोळीतील सर्वांनाच हद्दपार करण्याबाबत जनतेमधून मागणी होत होती. प्रस्तावित दोन्ही टोळीमधील सात जणांना हद्दपार करावे, अशी मागणी उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. त्यावर चौकशी व सुनावणी होऊन दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण पोलिस अधीक्षकांनी या दोन टोळ्यातील सात जणांना तडीपार केले आहे. या सुनावणीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहाय्यक पोलिस फौजदार मधुकर गुरव यांनी पुरावे सादर केले होते.
संपादन : बाळकृष्ण मधाळे