अहो आश्‍चर्य...एसटीचे अधिकारी प्रवाशांऐवजी व्यापाऱ्यांच्या दारी!

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे सावर्जनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी आता एसटीने काळाची पावले ओळखून कामाच्या पद्धतीत बदल केला आहे. प्रवासी वाहतूक नसली, तरी एसटीने आता माल वाहतुकीवर भर दिला आहे. त्यासाठी 372 एसटी बस माल वाहतुकीसाठी सज्ज केल्या आहेत. व्यापाऱ्यांनी मालाची वाहतूक एसटीच्या वाहनातून करावी, यसाठी एसटीचे अधिकारी, कर्मचारी व्यापाऱ्यांच्या दारात जात आहेत. त्यांना साकडे घालून मालाची वाहतूक करण्यासाठी एसटीच्या वाहनाचाच आग्रह धरत आहेत. 

कोरोनाने मार्च महिन्यापासून डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत कडक लॉकडाउन पाळण्यात आला. एकमेकांच्या संपर्कामुळे हा आजार होत असल्याने सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच बंद केली. त्याचबरोबर अत्यावश्‍यक कामासाठी घराबाहेर पडण्यासह जिल्हाबंदीचाही निर्णय घेण्यात आला. त्याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. एसटीच्या बसची चाके जागेवरच थांबल्याने एसटीचे सर्व अर्थकारण कोलमडले आहे.

ज्या वेळी एसटीची चाके फिरतील त्या वेळी ती पूर्वपदावर येतील. मात्र, तोपर्यंत एसटीकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे अपुरे पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री व एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवाशी वाहतूक सुरू नसली, तरी एसटीने मालवाहतूक केल्यावर उत्पन्नात वाढ होईल, यासाठी ती सेवा सुरू केली आहे. सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर एसटीने मालवाहतुकीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे. त्यामार्फत औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक, छोटे-मोठे कारखानदार, लघुउद्योजक, कृषी वस्तूंचे व्यापारी, शेतकरी यांच्या भेटी-गाठी घेऊन त्यांना एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती देऊन त्यांना एसटीनेच माल वाहतूक करावी, असे साकडे अधिकारी, कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोचून घालत आहेत. 

एसटी महामंडळाचे राज्यात 250 आगार आहेत. एसटीच्या प्रत्येक विभागात दहा प्रमाणे 330 बसचे मालवाहतूक बसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्याचबरोबर महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून 300 मालवाहतूक बस कार्यरत आहेत. त्यानुसार आजअखेर 372 बस मालवाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सुरक्षित सेवेमुळे राज्यात एसटीने मालवाहतूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. 21 मेपासून आतापर्यंत मालवाहतूक एसटीने 543 फेऱ्यांच्या माध्यमातून तीन हजार टन मालाची वाहतूक केली आहे. त्यासाठी 90 हजार किलोमीटरचा प्रवास या वाहनांनी केला असून, त्यापोटी महामंडळाला 21 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. 


एसटीची अशीही बांधीलकी 

जीवन वाहिनी म्हणून एसटी महामंडळाच्या बसकडे पाहिले जाते. एसटीने लॉकडाउनच्या काळातही सेवाभाव जपत परराज्यातील पाच लाखांहून अधिक लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोचवले आहे. त्याचबरोबर तब्बल 152 लाख किलोमीटरचा प्रवास त्यासाठी बसने केला आहे. सामाजिक बांधीलकीतून ना नफा ना तोटा या तत्त्वावर बसने सरकारच्या आदेशानुसार ही कार्यवाही केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com