
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात एकूण 11 तालुक्यांत सातारा तालुक्यातील विद्यार्थी सर्वांत जास्त संख्येने चमकले आहेत. इयत्ता पाचवीच्या विभागात एकूण 77 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान पटकावला.
सातारा : नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात सातारा तालुक्याने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. इयत्ता पाचवी अन् आठवी इयत्तांत मिळून 175 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. तालुकानिहाय शिष्यवृत्तीधारकांचा विचार करता राज्यातही ही संख्या मोठी मानली जात आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात एकूण 11 तालुक्यांत सातारा तालुक्यातील विद्यार्थी सर्वांत जास्त संख्येने चमकले आहेत. इयत्ता पाचवीच्या विभागात एकूण 77 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान पटकावला. इयत्ता आठवीच्या विभागात एकूण 98 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. दोन्ही विभागांत मिळून एकूण 175 विद्यार्थी यशस्वी झाले. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली. इयत्ता पाचवीच्या विभागात अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे सर्वांत जास्त म्हणजे 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. त्यापाठोपाठ न्यू इंग्लिश स्कूल (दहा), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी (आठ), महाराजा सयाजीराव विद्यालय (सहा), रा. ब. काळे विद्यालय (पाच) या शाळांनी भरीव यश पटकविले.
इयत्ता आठवीच्या विभागात अण्णासाहेब कल्याणी विद्यालय (21), न्यू इंग्लिश स्कूल (14), महाराजा सयाजीराव विद्यालय (दहा), गुरुकुल विद्यालय (दहा), छत्रपती शिवाजी विद्यालय, अपशिंगे मिलिटरी (सहा) या शाळांनी पहिल्या पाच क्रमांकात स्थान पटकावले. सातारा तालुक्यापाठोपाठ खटाव अन् कऱ्हाड तालुक्याने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी अन् त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे पंचायत समितीचे सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण तसेच सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. दरम्यान, खटाव तालुक्यातील इयत्ता पाचवीचे 68, तर इयत्ता आठवीचे 88 असे मिळून एकूण 156 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. कऱ्हाड तालुक्यातील इयत्ता पाचवीचे 84, तर इयत्ता आठवीचे 59 असे मिळून एकूण 143 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
महापरिनिर्वाणदिनी महामानवाला घरुनच अभिवादन करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट, शिक्षक अन् पालकांची मेहनत, अधिकारीवर्गाचे मार्गदर्शन यामुळे यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात सातारा तालुक्याने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. हे यश तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारे आहे.
-संजय धुमाळ, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सातारा
संपादन : बाळकृष्ण मधाळे