
कऱ्हाड (जि. सातारा) : सामाजिक बांधिलकीतून ऑक्सिजन ग्रुपसह अन्य दानशूर मोफत ऑक्सिजन यंत्रे देण्यासाठी पुढे येत आहेत. त्यातून अनेकांना कृत्रिम श्वास मिळत आहे. त्यामुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेकांना मोफत यंत्रे देताना मर्यादा येत आहेत. परिणामी अनेकांना आपल्या नातेवाइकांसाठी काही व्यापाऱ्यांकडून विकत ऑक्सिजन सिलिंडर घेण्याची वेळ येत आहे. मात्र, त्यांच्याकडून एका सिलिंडरसाठी 40 हजार डिपॉझिट आणि दहा हजार भाडे घेतले जात आहे. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने त्यांनी संधीत चांदी करून घेण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती झाली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक त्या प्रमाणात बेड उपलब्ध नाहीत. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना घरीच होम आयसोलेट केले आहे. त्याचबरोबर ज्यांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही त्यांना आवश्यकतेनुसार घरीच ऑक्सिजन लावला जात आहे. त्यासाठी ऑक्सिजन ग्रुपमधील अनेक व्यापारी, उद्योजक, नगरसेवक, समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना, काही समाजांनी लहान ऑक्सिजन मशिन विकत घेतल्या आहेत. त्या मशिन ते रुग्णांना घरीच ऑक्सिजन लावण्यासाठी मोफत देत आहेत. त्या माध्यमातून शहरासह परिसरात सध्या 200 हून अधिक मशिन आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांना बेड मिळेपर्यंत घरीच ऑक्सिजन मिळाल्याने त्यांचा जीव वाचण्यासही मदत झाली आहे. अशा मशिनवर बरे झालेल्यांचीही काही उदारहणे आहेत. मात्र, एवढ्या ऑक्सिजन मशिन असूनही त्या अपुऱ्याच पडत आहेत. "रुग्णसंख्या मोठी आणि मशिन तोकड्या' अशी स्थिती झाली आहे.
अशा पार्श्वभूमीवर ज्यांच्या घरात कोरोनाबाधित आहे, त्यांना नाइलाजास्तव विकत ऑक्सिजनचा सिलिंडर घ्यावा लागतो आहे. मात्र, तो विकत घेताना संबंधित व्यावसायिक एका सिलिंडरसाठी 40 हजार डिपॉझिट आणि दहा हजार भाडे घेत आहेत. कोरोना संकट काळात अनेकांच्या हाताचे काम गेले आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वांचीच आर्थिक स्थिती बेताची झाली आहे. याचा विचार करता सध्या कोणालाही एवढे भाडे आणि डिपॉझिट परवडत नाही. मात्र, गरज म्हणून आणि घरातील कुटुंबीयांचा जीव वाचवण्यासाठी अनेकांना ते घेण्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे अशा दुकानदारांचे फावते आहे. त्यातून त्यांनी या महामारीच्या संकटातही पैसे कमावण्याचे उद्योग सुरू ठेवले आहेत. त्यामुळे रोगापेक्षा इलाजच भयंकर अशी स्थिती झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनीच लावावा चाप
कोरोनामुळे सध्या आपत्ती कायदा लागू आहे. या आपत्तीत रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या सिलिंडरसाठी माणुसकीच्या भावनेतून दर कमी करणे आवश्यक होते. मात्र, व्यावसायिकांनी ही संधी साधून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचे काम सुरू ठेवलेले आहे. त्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष देण्याची गरज आहे. अशा दुकानदारांवर आपत्ती कायद्यांतर्गत कारवाई करून तातडीने दर कमी करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांतून होत आहे.
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.