चाकेच हालत नसल्याने उपासमारीची वेळ, व्यथा खासगी प्रवासी वाहनचालकांची

रविकांत बेलोशे 
Thursday, 17 September 2020

लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे अनेक व्यवसाय सुरू झाले असले तरी गेले सहा महिने बंद असलेली प्रवासी वाहतूक अद्यापही बंद असल्यामुळे वाहनचालकांसह मालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.

भिलार (जि. सातारा) : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या परवानाधारक व खासगी प्रवासी गाड्या गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याने या गाडीमालक व चालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या वाहनचालकांच्या विविध अडचणी लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींसह शासनाने तातडीने लक्ष घालून या व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी व नियम घालून या व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी या वाहनचालकांमधून केली जात आहे. 

लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे अनेक व्यवसाय सुरू झाले असले तरी गेले सहा महिने बंद असलेली प्रवासी वाहतूक अद्यापही बंद असल्यामुळे वाहनचालकांसह मालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. बहुतांशी वाहनचालकांनी आपल्या गाड्या बॅंका, पतसंस्था व इतर फायनान्स कंपन्यांकडून कर्जावर घेतलेल्या आहेत. हा व्यवसायच सहा महिने ठप्प असल्याने कंपन्यांनी आता कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला आहे. परंतु, धंदाच 
बंद असल्यामुळे या व्यावसायिकांची कोंडी झाली आहे.

व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी बऱ्याच चालकांनी शेती, भाजीपाला, बिगारी व इतर व्यवसायांची कास धरली आहे. पण, कोरोनामुळे हेही व्यवसाय अडचणीत आहेत. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटाला या व्यावसायिकांना सामोरे जावे लागते आहे. सर्वांनाच आर्थिक चणचण भासत असल्याने हे व्यावसायिक अनोख्या संकटात अडकले आहेत. 

उद्योग व्यवसायापेक्षा बरेच तरुण या व्यवसायात राहून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवताहेत. बहुतांश तरुण मालवाहतुकीबरोबरच परवानाधारक प्रवासी वाहतूक व्यवसायात आहेत. हजारो तरुण या वाहतूक व्यवसायावर अवलंबून आहेत. या वाहनांची चाके गेले सहा महिन्यांपासून थांबली असल्याने पूर्णतः वाहतूक व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधी व शासनाने या व्यावसायिकांचा विचार करून काही अटी शिथिल कराव्यात व व्यवसाय तरी सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या व्यावसायिकांमधून होत आहे. 

""टाळेबंदीमुळे सहा महिन्यांपासून आमचा व्यवसाय बंद असल्याने आमच्या हाताला आता काम नाही. गाडी चालवून मासिक 15 ते 20 हजार रुपये मिळत होते. त्यातून गाडीचे हप्ते, घर खर्च भागवण्यासाठी मदत होत होती. सध्या उत्पन्न नसल्यामुळे सर्वच ठप्प झाले आहे. त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.'' 
-दीपक जाधव, व्यावसायिक, तळदेव 

""कोरोनामुळे सध्या आमच्या व्यवसायावर संक्रांत आली असून, सर्व ठप्प झाल्याने आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. सहा महिन्यांपासून गाड्यांची चाकेच हालली नसल्याने बॅंकेचे हप्ते जाईनासे झाले आहेत. त्यामुळे आता मोठी आर्थिक कुचंबणा आमची झाली आहे. लोकप्रतिनिधी व शासनाने यात लक्ष घालून या व्यवसायाचा विचार करावा, असे आमचे म्हणणे आहे.'' 
-शरद बेलोशे, व्यावसायिक 

संपादन : पांडुरंग बर्गे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara The Time Of Starvation Due To The Wheel Not Moving The Trouble Of Private Passenger Drivers