दानशूरांच्या सहभागातून उभारली उपचार खोली

राजेश पाटील 
Monday, 21 September 2020

ऑक्‍सिजन मशिन, थर्मामीटर, ऑक्‍सिमीटर, टेम्परेचर गन, ब्लड शुगर टेस्ट किट्‌स, हॅंडग्लोज, मास्क पीपीई किट्‌स आदी साहित्य खरेदी करण्यात आले. गावातील प्राथमिक शाळेजवळ ऑक्‍सिजन बेडसह उपचार खोलीही तयार करण्यात आली आहे.  

ढेबेवाडी (जि. सातारा) : कोरोनाच्या काळात तातडीची उपचार सुविधा उशाला असावी म्हणून अंबवडे खुर्द (ता. पाटण) येथील दानशूर ग्रामस्थांनी एकत्र येत ऑक्‍सिजन बेडसह उपचार खोली तयार केली असून, नियमित तपासणीसाठी विविध उपकरणेही तेथे उपलब्ध करून दिली आहेत. 

अंबवडे खुर्दमध्ये पोलिस पाटील लक्ष्मण पाटील यांनी मांडलेल्या संकल्पनेला युवा नेते अंकुश मोंडे यांनी प्रतिसाद देत सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामस्थांना आवाहन केले. आठवडाभरातच सुमारे 50 हजार रुपयांची रक्कम जमा झाली. त्यातून ऑक्‍सिजन मशिन, थर्मामीटर, ऑक्‍सिमीटर, टेम्परेचर गन, ब्लड शुगर टेस्ट किट्‌स, हॅंडग्लोज, मास्क पीपीई किट्‌स आदी साहित्य खरेदी करण्यात आले. गावातील प्राथमिक शाळेजवळ ऑक्‍सिजन बेडसह उपचार खोलीही तयार करण्यात आली.

गटविकास अधिकारी मीना सांळुखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे आदींच्या हस्ते या सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. सरपंच कृष्णत सुर्वे, शंकर मोंडे, दत्तात्रय पाटील, लक्ष्मण पाटील, अंकुशराव मोंडे, बबनराव मोंडे, रामचंद्र मोंडे, गणपतराव कोळेकर, तानाजी माने, यशवंत नांगरे, दिनकर मोंडे, चंद्रकांत चोरगे, डॉ. पाटील, मुख्याध्यापिका उज्वला पाटील, अशोक पाटील, सचिन भांडे, डॉ. गणेश पवार, तानाजीराव जाधवर आदी उपस्थित होते.

डॉ. पाटील यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. अंकुश मोंडे, दत्तात्रय पाटील, शंकर मोंडे गुरुजी यांनी या संकल्पनेबाबत माहिती दिली. ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी साळुंखे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, सचिन भांडे यांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. गणपतराव कोळेकर यांनी स्वागत केले. यशवंत नांगरे यांनी आभार मानले.  

 
संपादन : पांडुरंग बर्गे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Treatment Room Built With The Participation Of Philanthropists