उदयनराजे पुन्हा मैदानात; राज्य सरकारकडे केली ही मागणी

उदयनराजे पुन्हा मैदानात; राज्य सरकारकडे केली ही मागणी

सातारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्याला दिलासा देण्यासाठी सर्व नगरपंचायत व नगरपालिकेतील मिळकतींची चालू वर्षाची घर व पाणीपट्टी राज्य शासनाने माफ करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व संस्थांनी सर्वसाधरण सभेत ठराव मंजूर करून राज्य शासनाला शिफारस करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. अनेक देशांचे कंबरडे मोडले असतानाही सामान्य माणूस जगला पाहिजे, म्हणून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यशासनही कृषी विषयक, तसेच वीजबिलाबाबत नागरिकांना सवलत देण्यासह अनेक उपाय योजत आहे. त्याच धर्तीवर कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्‍वभूमीवर 22 मार्चपासून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. सर्वांचे उद्योग व कामधंदे बंद राहिले. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांची कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. 

मंडई, पानशॉप, जनरल स्टोअर्स, छोटे उद्योगधंदे करणारे, स्वयंरोजगार करणारे, कामगार वर्ग आदी सर्वांचेच रोजीरोटीचे व्यवसाय एक तर पूर्णपणे बंद आहेत किंवा शासनाने दिलेल्या सवलतीच्या वेळेत रडत-खडत सुरू आहेत. अत्यंत बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना प्रत्येक सातारकर नागरिकांना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे राज्यातील नागरिकांची अवस्था आहे.

दैनंदिन गरजा भागवण्यास सातारकरांबरोबरच राज्यातील प्रत्येक नागरिक धडपत आहेत. अशा वेळी त्यांच्यावर घरपट्टी व पाणीपट्टीचा बोजा टाकणे माणुसकीच्या भावनेला धरून राहणार नाही. त्यामुळे राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमधील मिळकतधारकांची या वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेऊन शासनाने सर्वसामान्य नागरिकांना बळ दिले पाहिजे, अशी आमची मनापासूनची मागणी असल्याचेही उदयनराजेंनी म्हटले आहे. 

शासनाने असा निर्णय घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये शासनाने घर व पाणीपट्टी माफ करावी, असा ठराव मंजूर करावा. नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्याबाबत राज्य शासनाला शिफारस करून राज्यामध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहनही उदयनराजे यांनी आज जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com