
सातारा : अस्वच्छ सातारा असुंदर सातारा
सातारा : शहरातील प्रमुख रस्त्यांवर उभारलेल्या दुभाजकांमध्ये परिसरातील व्यापाऱ्यांकडून कचरा टाकण्यात येत आहे. या कचराफेकीमुळे दुभाजकांना कचरा कुंडीचे स्वरूप आले आहे. दुभाजकांमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. व्यापारी, पथारीवाल्यांच्या कचराफेकीकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असून यामुळे ‘अस्वच्छ सातारा...असुंदर सातारा’ अशी शहराची कुप्रसिध्दी होऊ लागली आहे.
सातारा शहरातील मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणानंतर पालिकेने त्याठिकाणी दुभाजक तयार केले. या दुभाजकामंध्ये पालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले असून त्यांच्या देखभालीसाठी खासगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. दुभाजक आणि लावलेल्या शोभीवंत झाडांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली होती. या दुभाजकांना पालिकेच्या दुर्लक्षामुळे तसेच परिसरातील व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे सध्या अवकळा प्राप्त झाली आहे. सातारा तहसीलदार कार्यालय ते मध्यवर्ती बस स्थानक या मुख्य रस्त्यावरील दुभाजकाची महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या काळात रंगरंगोटी करण्यात आली होती.
याच दुभाजकामध्ये नंतरच्या काळात परिसरातील व्यापारी, पदपथ विक्रेते, पथारीवाल्यांनी कचरा फेकण्यास सुरुवात केली आहे. या फेकलेल्या कचऱ्याचे ढीग त्याठिकाणी साचले असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दुकानात तयार होणारा प्लॅस्टिकच्या पिशव्यांत साठवून फेकण्यात येत असल्याने याठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीचादेखील वावर सुरू झाला आहे.
Web Title: Satara Unsightly Satara Unsightly
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..