
महाबळेश्वर (जि. सातारा) : तालुक्यातील डोंगरउतारावरील आणि दुर्गम ठिकाणी वसलेले गोरोशी हे गाव आता तीन पाणीयोजना एकत्र करून अखेर टॅंकरमुक्त करण्यात प्रशासनासह पदाधिकाऱ्यांना यश मिळाले आहे. आता गावाला 24 तास पाण्याची उपलब्धता निर्माण झाली आहे.
महाबळेश्वरपासून 26 किलोमीटर अंतरावर वसलेल्या गोरोशी गावाची लोकसंख्या 250 ते 300. गावाला पारुट गावापासून एका जिवंत झऱ्याचे पाणी उपलब्ध होत होते. परंतु, उन्हाळा आला की हळूहळू झऱ्याचे पाणी आटून जाई व एप्रिल, मे मध्ये झऱ्याच्या पाण्याचा प्रवाह पूर्णपणे आटून बंद होत होता. त्यातच मुंबईतील चाकरमानी सुटीसाठी गावाकडे कुटुंबीयांसमवेत आल्यावर गावाला टॅंकरनेच पाणीपुरवठा करावा लागत होता. अखेर गावाला अखंड पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोनच्या योजनेमधून सुधारित पध्दतीची तीन लाख लिटर पाणी क्षमतेची लोखंडी टाकी मंजूर करण्यात आली.
झऱ्याचे पाणी या टाकीमध्ये साठवणूक करण्यात येऊ लागले व त्याचा पुरवठा गावाला होऊ लागला. त्यामुळे काही अंशी पाण्याचे दुर्भिक्ष कमी होऊन पाणी उपलब्ध करण्यात पंचायत समितीच्या माध्यमातून पदाधिकारी यशस्वी झाले होते. वेळप्रसंगी टॅंकर पुरवला जाऊ लागला. त्यानंतर येथील पाण्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी मनरेगा अंतर्गत विहिरीचा प्रस्ताव मंजूर करून गावाने विहिरीचे काम सुरू केले. या विहिरीला 20 फुटांवरच चांगले पाणी लागल्याने गोरोशी गाव हे चांगले पाणीदार झाले. त्याला नुकतीच शासनाच्या टंचाई अंतर्गत तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत मोटार, पाइपलाइन, वीज प्रवाह आदी कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला व हे काम पूर्ण करून घेण्यात आल्यामुळे गोरोशी हे गाव केवळ शंभर टक्के टंचाईमुक्तच नव्हे तर टॅंकरमुक्त गाव झाले आहे. आमदार मकरंद पाटील यांनीही गावाला भेट देऊन योजनेची पाहणी करून सर्व सहभागींचे कौतुक केले.
...यांनी दिले योगदान
तीन योजना एकत्र करून 100 टक्के टंचाईमुक्त झालेले हे गाव राज्यातील पहिले असावे, अशी माहिती बाळासाहेब भिलारे यांनी दिली. गाव टंचाईमुक्त करण्यासाठी श्री. भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती अंजना कदम, माजी सभापती रूपाली राजपुरे, उपसभापती संजय गायकवाड, गटविकास अधिकारी नारायण घोलप, विस्तार अधिकारी सुनील पार्टे यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.