काॅलेजचा हा प्रश्न साेडविण्यासाठी माणदेश एकवटला; कुणी दहा दिले तर कुणी लाख

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

या सर्व प्रयत्नांना यश आले अन दहिवडी काॅलेजमध्ये पाणी पोहचले. पाणी पोहचल्याने सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

दहिवडी  : वर्षानुवर्षे असलेली पाणी टंचाई. दरवर्षी फक्त पाण्यासाठी होणारा लाखोंचा खर्च. हे सगळं संपुष्टात आणलं ते विद्यार्थी, पालक, शिक्षक व दानशूरांच्या सामूहिक प्रयत्नातून दहिवडी काॅलेजचा पाणी प्रश्न संपुष्टात आल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

दुष्काळी माण तालुक्यामध्ये बुद्धीचा सुकाळ आहे. अन याचं महत्वाचं केंद्र म्हणजे दहिवडी कॉलेज दहिवडी. तसेच दहिवडी येथील संपुर्ण रयत संकुल. हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या संकुलाला मात्र कायमस्वरूपी पाणी प्रश्न भेडसावत होता. साडेचार हजार विद्यार्थी, विद्यार्थीनींचे वसतीगृह, साडे सहा एकराचा कॅम्पस यासाठी दररोज पिण्यासाठी साधारण पाच हजार लिटर, स्वच्छतागृहासाठी साधारण दहा हजार लिटर तसेच विद्यार्थीनी वसतीगृहासाठी साधारण पाच हजार लिटर पाणी लागत होते. प्रत्येकी आठशे रुपयांचे कमीत कमी चार टँकर पाणी दररोज लागत होते. तसेच साडेतीन एकराच्या फळझाडांच्या बागेलाही मोठ्या प्रमाणात पाणी लागत होते. या सर्वांसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च येत होता.

हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढायचा निर्धार प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी केला. त्यानुसार पावले टाकण्यास सुरुवात केली. विहिरीसाठी पिंगळी तलावाखाली आशालता पाटणकर यांनी तीन गुंठे जमीन बक्षिस पत्र करुन दिली. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी आपल्या खिशातून आर्थिक मदत केली. त्यामुळे तब्बल 12 लाख 60 हजार रुपये खर्च करुन विहीर तयार करण्यात आली. 4.5 लाख रुपये खर्च करुन स्वतंत्र विद्युत जोडणी घेण्यात आली. विहीर ते दहिवडी कॉलेज या साडेतीन किलोमीटर अंतराची पाईपलाईन करण्यासाठी तब्बल अकरा लाख रुपये खर्च आला.

या सर्व प्रयत्नांना यश आले अन गुरुवार 18 जून रोजी दहिवडी काॅलेजमध्ये पाणी पोहचले. पाणी पोहचल्याने सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या पाण्याचे पूजन रयतचे मॅनेजिंग कौंसिल सदस्य प्रभाकर देशमुख, नगराध्यक्ष सतिश जाधव, प्रा. डॉ. बी. टी. जाधव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेब सावंत, नंदकुमार खोत, प्राचार्य बी. एस. खाडे, उपप्राचार्य बी. एस. बळवंत, व्ही. एस. मस्के, अजित पवार, टी. एस. माने, अमोल ढगे, अनिल शिंगाडे, एम. बी. शिकलगार, आप्पासाहेब देशमुख, धनाजी मोरे, दशरथ मोरे, बाळू मोरे, हनमंत खाडे, सतिश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

"दहिवडी काॅलेजसह रयत संकुलाचा पाणी प्रश्न कायमचा संपुष्टात आल्याचे समाधान आहे. यासाठी मदत करणार्यांचा रयतच्यावतीने मी आभारी आहे."
प्रभाकर देशमुख, सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा.

 

"या कामासाठी लाखो रुपयांची गरज होती. उद्योग मंत्रालयाचे उपसचिव नामदेव भोसले यांनी एक लाख रुपये देवून सुरुवात केली. त्यानंतर कुणी दहा रुपये दिले तरी घेतले अन कुणी लाख दिले तरी घेतले. त्यामुळे सर्वांच्या सहकार्यातून एवढे मोठे काम पुर्ण होवू शकले."

प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव.

"रयत संकुलाचा पाणी प्रश्न संपुष्टात आला असून यासाठी व यापुढील प्रत्येक कामासाठी नगरपंचायत मदतीसाठी तत्पर आहे."
सतीश जाधव, नगराध्यक्ष, नगरपंचायत दहिवडी.

 

डिजिटल इंडिया मिशनचा पर्दाफाश; बेरोजगार युवकांची फसवणुक टळणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Water Scarcity Problem Solved In Dhaiwadi College