Satara : पाणी योजना चालणार सौरऊर्जेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solar energy

Satara : पाणी योजना चालणार सौरऊर्जेवर

सातारा : जलजीवन मिशन योजनेंतर्गत सातारा जिल्हा अग्रेसर राहिला आहेत. या योजनेत आता आमूलाग्र बदल होत असून, जलजीवनच्या माध्यमातून वीज बचतीचे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यात सोलर पॅनेलवर चालणाऱ्या २०२ योजना मंजूर झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ४१ योजना कऱ्हाड तालुक्यातील आहेत. बहुतांश योजना सौरऊर्जेवर चालणार असल्याने गावोगावच्या वीजबिलांचाही प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे.

ग्रामीण भागात पिण्याचे शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने गावागावांत प्रत्येक घरात नळ जोडणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. २०२४ पर्यंत ‘हर घर जल से नल’ हे घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवत प्रत्येकाला पाणी उपलब्ध करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या योजनेतील कामासाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. त्यानुसार गावोगावी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागात, तर शहरी भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. २०२४ पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणी करून पाणीपुरवठा करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनांसाठी सुरुवातीला वीजबिलाचा मोठा अडथळा होता. आधीच गावच्या पथदिव्यांची वीजबिले थकल्याने महावितरणने अनेक गावांची वीज जोडणी तोडली होती. त्यात आता जलजीवन योजनांचा अतिरिक्त भार ग्रामपंचायतीवर पडत होता. मात्र, आता योजनेतील बहुतांशी योजना सौरऊर्जेवर चालणार असल्याने वीजबिलांचा अडथळा दूर होणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात पाच लाख ७७ हजार ४३ कुटुंबे असून, आतापर्यंत सुमारे चार लाख ७५ हजार ६०४ कुटुंबांना नळ जोडणी दिली आहे. जलजीवन मशिनमध्ये पुणे विभाग राज्यात आघाडीवर असून, त्यात सातारा जिल्हा अग्रेसर आहे. याचबरोबर १७५ योजनांना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग व गटविकास अधिकाऱ्यामार्फत निधीही वितरित केला आहे. जलजीवन मिशनमुळे जिल्ह्यातील दुर्गम व डोंगरी भागातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायत विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत.

या योजनेमुळे जुन्या पाणीपुरवठा योजनाही निधी मिळाल्यामुळे त्या ऊर्जितावस्थेत येणार आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील एकूण गावांपैकी ४० गावांमध्ये जागेअभावी योजनेचे कामे रखडली होते; परंतु सद्यःस्थितीत १३ गावांमधील काम मार्गी लागले असून, उर्वरित कामेही लवकर सुरू होतील, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

अन्य विकासकामे सेाईचे...

सौरऊर्जेचे रूपांतर विद्यूत ऊर्जेत करून महावितरण कंपनीस नेट मीटरद्वारे वीज देणे सोईचे होणार आहे. या बदल्यात ज्या प्रमाणात सोलर पॅनेलद्वारे वीजनिर्मिती होणार आहे. त्या प्रमाणात ग्रामपंचायतीस देय असणाऱ्या वीजबिलातून सोलर पॅनेलद्वारे निर्माण होणाऱ्या वीज युनिटनुसार सरसकट वीजबिलातून कपात झाल्यास ग्रामपंचायतीस आर्थिक भार सोसावा लागणार नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीस वीजबिलात होणाऱ्या लाभातून अन्य विकासकामे करणे सोपे होणार आहे.