कोयनातील "या' धबधब्यांचे आता सुशोभीकरण, दीड कोटीची तरतूद

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा)  : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कोयना पर्यटन आराखड्यासाठी दीड कोटींची तरतूद केली आहे. ओझर्डे व गाढवराई धबधबा परिसरात सुशोभीकरण, निसर्गवाट बळकटीकरण, घाटमाथा ते हुंबरळी असा वॉकिंग ट्रॅक, जंगली जयगडला वॉकिंग ट्रॅक बळकटीकरण, केमसे नाका-घाटामाथ्यावरील रासाटी संरक्षण कुटी, केमसे नाका ट्रेकरुट निसर्ग पाऊलवाट बळकटीकरणासह अन्य कामासांठी एक कोटी 50 लाखांची तरतूद केली आहे. 

सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या 2020-21 च्या सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कोयना पर्यटन आराखड्यासंदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. त्यात शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरस्थित उपसंचालक एम. एन. मोहिते, सहायक वन्यजीवचे वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वन्यजीवचे वनक्षेत्रपाल श्री. कुंभार उपस्थित होते. त्या बैठकीत कोयना पर्यटन आराखड्याला मंजुरी मिळाली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील विकासकामे करताना तेथील लोकप्रतिनिधींना विचारात घेऊनच करावीत, असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले होते. त्यानुसार मंत्री देसाई यांनी सुचवलेल्या कोयना पर्यटन आराखड्याचा सह्याद्री व्याघ्रच्या सन 2020-21 च्या आराखड्यात समावेश केला आहे. पर्यटन आराखड्यास एक कोटी 50 लाखांची तरतूद केली आहे. स्थानिकांच्या विकासासाठी पर्यटनास व उपजीविका निर्मितीस चालना देण्यासह विविध विकासकामांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. 

कोयना पर्यटन आराखड्यातून ओझर्डे धबधबा परिसर सुशोभीकरण, प्रवेशव्दाराजवळ फरसबंदी, चेंजिंग रूम, टॉयलेटसह पाणी व विद्युत व्यवस्था, परिसरात 700 मीटर रस्त्याचे मजबुतीकरण, पर्यटकांसाठी ओठा व रेलिंग मजबुतीकरण, परिसर देखरेख व नियंत्रणासाठी मजूर नेमणे आदी कामे होणार आहेत. 

रामघळ धबधब्यापासून 300 मीटर पायवाटेचे मजबुतीकरण, विविध ठिकाणी रेलिंग आणि पर्यटक तपासणी नाका धबधब्यासाठी स्वागत कमान बसविणे ही कामे होणार आहेत.गाढवराई धबधब्याकडे जाणारी निसर्गवाट बळकटीकरण, धबधब्याची माहिती सांगणारे माहितीफलक लावणे, घाटमाथा ते हुंबरळी वॉकिंग ट्रॅक बळकटीकरण, जंगली जयगड येथील वॉकिंग ट्रॅक बळकटीकरण अशी कामे होणार आहेत. 
केमसे नाका ते रासाटी संरक्षण कुटी उभारणे, केमसे नाका ट्रेकरुट तयार करणे, केमसे येथे निसर्ग पाऊलवाट बळकटीकरण करणे, पर्यटकांच्या माहितीसाठी जागोजागी वॉकिंग ट्रॅकची निर्मिती, पर्यटन माहितीचे मॅपचे पॉइंट विकसित करणे आदी कामे होणार आहेत. 


""सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या नियामक मंडळाच्या सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात कोयना पर्यटन आराखड्याचा समावेश करण्यात आला. पाटण मतदारसंघातील कोयना पर्यटन आराखड्याचा समावेश करण्यात आल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी राज्यभरातून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना त्या सुविधा मिळणार आहेत.'' 

-शंभूराज देसाई, 
गृहराज्यमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com