आमच ठरलं... या 15 गावांत "एक गणपती'

रविकांत बेलाेशे
Friday, 14 August 2020

यावर्षी या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटींना अधीन राहूनच गणेशोत्सव साजरा करावा लागणार असल्याने पाचगणी परिसरातील 15 गावांत एक गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

भिलार (जि. सातारा) : पाचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 15 गावांतील गणेशोत्सव मंडळांनी एक गाव, एक गणपती संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वाईचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिली. 

पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील टाउनहॉलमध्ये विविध गावांतील गणेश मंडळांचे अध्यक्ष, पोलिस पाटील, कार्यकर्त्यांच्या गणेशोत्सवासंदर्भात झालेल्या बैठकीत श्री. टिके बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, पाचगणीचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता एस. एन. बाचल आदी उपस्थित होते. श्री. टिके म्हणाले, ""शहर व परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, यावर्षी या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटींना अधीन राहूनच गणेशोत्सव साजरा करावा. कायद्याचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील. कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. लोकांची भीती कमी झाली असली तरी धोका टळला नाही. गणेश मंडळांनी या वर्षी मंडप टाकून मूर्ती बसवण्यापेक्षा मंदिरात मूर्ती बसवावी. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. त्याचबरोबर गरिबांना आर्थिक मदत करावी.'' 

गिरीश दापकेकर म्हणाले, ""पाचगणीचे नागरिक प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करून सुरक्षित अंतर पाळत गणेशोत्सव साजरा करतील.'' यावेळी एस. एन. बाचल यांचेही भाषण झाले. पालिकेने विसर्जनासाठी कृत्रिम व्यवस्था केली असून छोट्या मूर्तींचे दान करावे व पालिकेने ठेवलेल्या निर्माल्य कलशात निर्माल्य टाकून सहकार्य करावे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रजिस्टरवर नोंद करावी. प्रसाद वाटप करू नये, आदी सूचना सतीश पवार यांनी केल्या. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी समस्या मांडल्या. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. वैभव भिलारे यांनी आभार मानले. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

गुड न्यूज : सातारा जिल्ह्यात आयसीयू बेड वाढणार, काेणत्या तालुक्यात वाचा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara We decided ... "Ek Ganpati" in these 15 villages