esakal | शाब्बास..! या गावात मुरमाड शेतीत फुलवले सोयाबीन
sakal

बोलून बातमी शोधा

patan

पाटण तालुक्‍यातील मानेगावमधील प्रगतशील शेतकरी अधिकराव माने यांनी अशक्य ते शक्‍य करून दाखविले आहे. दुसऱ्या शेतकऱ्यांची माळरानावरची साडेतीन एकर मुरमाड जमीन वार्षिक खंडाने घेऊन त्यांनी ही अश्‍यक्‍य बाब शक्‍य करून दाखवली आहे. 

शाब्बास..! या गावात मुरमाड शेतीत फुलवले सोयाबीन

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) ः भांगलणी-कोळपणीशिवायही सोयाबीनचे जोमदार पीक घेता येते आणि तेही ओसाड व मुरमाड रानावर... मानेगाव (ता. पाटण) येथील प्रगतशील शेतकरी अधिकराव माने यांनी हे शक्‍य करून दाखविले आहे. दुसऱ्या शेतकऱ्यांची माळरानावरची साडेतीन एकर मुरमाड जमीन वार्षिक खंडाने घेऊन त्यांनी ही अश्‍यक्‍य बाब शक्‍य करून दाखवली आहे. 

मानेगावचे अधिकराव माने 1992 पासून शेतीत नवनवीन प्रयोग करत असून वडिलोपार्जित मुरमाड माळरानाची जमीन मोठ्या कष्टाने लागवडीखाली आणून उसासह भाजीपाला व फळपिकांचे विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले आहे. पत्नी कल्पना, बंधू सुभाषराव आणि उच्चशिक्षित मुलगा विजय आदी कुटुंब सदस्यांची मिळालेली भक्कम व सक्रिय साथ अधिकरावांना प्रगतीकडे घेऊन गेली आहे. आतापर्यंत विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला असून विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ते मार्गदर्शक बनलेले आहेत. या हंगामात त्यांनी आंतरमशागतीशिवाय सोयाबीन शेतीचा प्रयोग करायचा निर्णय घेतला. गावच्या हद्दीतील अन्य शेतकऱ्यांची पडीक मुरमाड साडेतीन एकर क्षेत्र वार्षिक खंडाने घेतली. नांगरणीला वेळ न मिळाल्याने कुळवणी, सड-काश्‍या वेचून त्यांनी शिवाराची सफाई केली. सोयाबीन पेरणी केल्यावर त्याच दिवशी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तणनाशकाची फवारणी केली. भांगलण व कोळपणीशिवाय तणांचा बंदोबस्त करत जोमदार पीक आणले. सध्या सोयाबीनने संपूर्ण शिवार झाकून गेले असून फुले व फुटव्यांचे प्रमाणही चांगले आहे. आतापर्यंत फक्त दोन हजार रुपये खर्च झाला असून निसर्गाने साथ दिल्यास 35 क्विंटलपर्यंत सोयाबीन उत्पादन सहज मिळेल, असा विश्वास अधिकराव माने यांनी व्यक्त केला आहे. 


काही तरी वेगळे करून दाखविण्याच्या प्रयत्नातून हे घडले. भांगलण-कोळपणीवरील मोठा खर्च टाळून अशा पद्धतीने केलेली शेती ही वेळ, श्रम व पैशाची बचत करणारी आहे. 

- अधिकराव माने, प्रगतशील शेतकरी, मानेगाव 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

निपचित पडलेल्या वृद्धेला या कर्मचाऱ्यांनी दिले जीवदान 

loading image
go to top