शब्बास! हा जवान करतोय मातृभूमीची अशीही सेवा

सुर्यकांत पवार
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

जवान जेंव्हा सुटीला गावी येतात तेव्हा कुटुंबीय आणि नातेवाइकांना जास्त वेळ देतात आणि आराम करून आपल्या सुटीचा आनंद घेतात; पण जावळी तालुक्‍यातील जवळवाडीती जवान विनायक जवळ हा मित्रांच्या मदतीने वृक्षसंवर्धन, बीजरोपण व जलसंधारणासारख्या कामांतून मातृभूमीची सेवा करत आहे. 

कास (जि. सातारा) ः जवळवाडीतील (ता. जावळी) केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान विनायक जवळ हे वृक्षसंवर्धन, बीजारोपण व जलसंधारण यासारख्या कामांतून आपल्या जन्मभूमीची सेवा करत आहेत. गावातील युवकांच्या मदतीतून प्रा. प्रकाश जवळ यांच्याबरोबर ते हे काम करत आहेत. 

जावळी तालुका हा शूरवीरांची भूमी. देशसेवेत अग्रेसर असणारा हा तालुका. येथील जवान देशसेवा करत असतानाच गावी आल्यावर आपल्या मातृभूमीच्या सेवेतही कसर ठेवत नाहीत. जवान जेंव्हा सुटीला गावी येतात तेव्हा कुटुंबीय आणि नातेवाइकांना जास्त वेळ देतात आणि आराम करून आपल्या सुटीचा आनंद घेतात; पण त्याला काही जवान अपवाद असतात. विनायक जवळ हा जवान त्यापैकीच एक. गावात सर्वच सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम सहभाग घेणारे आणि सोबत खूप मोठा मित्र परिवार असणारा हा जवान नुकताच दोन महिन्यांच्या सुटीनिमित्त जवळवाडीत आला आहे. पहिल्यापासून शेती आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या या जवानाने 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपला, की आपल्यासोबत आणलेल्या 115 चंदनाच्या झाडांच्या लागवडीपासून सुरुवात केली. सुरुवातीला डोंगरावर हजारो बीजांचे रोपण केले होतेच, तरीही रोज पाच तास काम करत त्यांनी पाणी आडवण्यासाठी असंख्य छोटे-मोठी चर काढले. हजारो लिटर पाणी जिरेल आणि गावातील पाणीपातळी वाढेल यासाठी डोंगरावर आणि पडीक जमिनीवर असंख्य खड्डे काढले. सुटी संपेपर्यंत हे काम असेच चालू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. यानिमित्ताने जन्मभूमीची सेवा करता आली याचे समाधान त्याने व्यक्त केले. 

युवकांचे कार्य अतिशय प्रेरणादायी असून, वृक्षारोपण आणि या शोषखड्डे काढल्यामुळे निसर्ग संपदेत वाढ होऊन गावाची पाणीपातळी निश्‍चितच वाढेल. 

- सदाशिव जवळ, अध्यक्ष, भैरवनाथ तरुण मंडळ. जवळवाडी 

आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आम्ही सीमेवर कायम दक्ष असतो, तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपण निसर्गाचे काही तरी देणेकरी आहोत या भावनेतून, कर्तव्यातून वृक्षारोपण आणि जलसंधारण करावे. 

- विनायक जवळ, जवान, केंद्रीय राखीव पोलिस दल 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

एरवी थंड असलेले महाबळेश्वर अचानक तापले, नेमकं काय झाले रात्री वाचा सविस्तर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Well done! This young man is doing such service to the motherland