गाव करील ते राव काय करील!

patan
patan

पाटण (जि. सातारा) ः सुरूलमधील (ता. पाटण) गावच्या मालकीची देवस्थान शेती संपूर्ण गाव एकत्र येऊन पिकविते. पेरणीपूर्व मशागत, पेरणी, आंतरमशागत, काढणी ही सर्व कामे शेतकरी करतात. मिळालेल्या उत्पन्नातून गावाच्या विकासाला हातभार लावतात. "गाव करील ते राव करणार नाही' अशी एक म्हण आहे, ती सार्थ ठरविणाऱ्या या गावाचा आदर्श घेणे गरजेचे आहे. 

पाटण शहरापासून हाकेच्या अंतरावर पाटण-मणदुरे रस्त्यावर तीन किलोमीटर अंतरावरील साधारण एक हजार लोकसंख्येचे सुरूल गाव. या गावात गावाचे ग्रामदैवत श्री मलोबादेवाची 12 एकर शेती आहे. त्यापैकी तीन एकर पिकाखालील, तर उर्वरित गवतपड आहे. देवस्थान जमीन खंडाने किंवा वाट्याने न देता गेली अनेक वर्षे ती सामुदायिक पद्धतीने कसली जाते. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य या जमिनीचे व्यवस्थापन पाहतात. स्वमालकीची शेती करताना गावाचा निर्णय होईल, त्या दिवशी नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी, काढणी व विक्री या सर्व घडामोडीत संपूर्ण गाव वेळ काढून सामुदायिक शेतीसाठी दिवसभर राबतात. 

संपूर्ण गावात कामापूर्वी एक दिवस अगोदर दवंडी दिली जाते. दुसऱ्या दिवशी प्रत्येक घरातील एक व्यक्ती काम करतो. ज्या कुटुंबातील श्रमदानास कोणी येणार नसेल, तो त्या दिवसाचा दंड समितीकडे जमा करतो. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही व सगळ्यांचा सामुदायिक शेतीस हातभार लागतो. त्यामुळे मशागत व पेरणीस गावातील सर्व बैलजोड्या व शेतकरी औजारांसह हजर असतात. पेरणीनंतर कोळपणी व भांगलणीची कामे एका दिवसात होतात. गावातील तरुण कोळपणी करतात व महिला भांगलणीची कामेही. बुजुर्ग लोक या सर्वांवर देखरेख करतात. या उपक्रमात गावातील तरुण मुले-मुलीही सहभागी होतात. खरीप हंगामात भात, सोयाबीन, नाचणी व भुईमूग, तर रब्बी हंगामात ज्वारी व हरभरा पिके घेतली जातात. पिके काढणीसाठीही संपूर्ण गाव हजर असते. पिकलेल्या धान्याची विक्री केली जाते. 

खरीप व रब्बी हंगामाच्या पिकाखालील जमीन सोडून इतर गवतपड असलेल्या जमिनीतील गवताचा लिलाव केला जातो. लिलावातून येणारे व पिकाच्या उत्पन्नातून येणारे उत्पन्न गावच्या विकासासाठी वापरले जाते. पिढ्यान्‌ पिढ्या ही पद्धत चालू असून प्रत्येकवर्षी गावकरी जबाबदारीने सहभागी होतात. देवस्थान जमिनीची जबाबदारी गेली अनेक पिढ्या गावकरी घेतात. शेतीत श्रमदान करताना गरीब-श्रीमंत असा भेदभाव नसतो. ज्या कुटुंबातील कोणी श्रमदानास येत नाही, ते एका मजुराची दिवसभराची ठरलेली मजुरीची रक्कम जमा करतात. त्यामुळे देवस्थान जमिनीच्या वहिवाटीत वादाचे प्रसंग निर्माण होत नाहीत. 


उन्हाळ्यात तीन महिने पाणीटंचाई असते. कोयना नदीवरून गावकरी विकत पाणी घेत होते. टंचाई काळात गावकऱ्यांचे चार ते पाच लाख रुपये विकत पाणी घेण्यावर खर्च होत होते. मात्र, यावर्षी शासकीय निधीशिवाय या जमिनीच्या उत्पन्नातून सव्वासहा लाख रुपये खर्च करून विहिरीचे काम केले आहे. 

- सुमन संकपाळ, सरपंच, सुरूल 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com