गाव कामगार तलाठ्यांच्या मनमानीला रोखणार कोण?, गावाचा कारभार तालुक्‍यावरून

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा) : तालुक्‍यातील तलाठी म्हणजे गावातील आण्णासाहेबांची सजातील उपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक तलाठी नेमणुकीच्या गावात न थांबता कऱ्हाडमधूनच म्हणजे तालुक्‍यावरून कारभार बघत आहेत. त्यामुळे अनेक गावांत ग्रामस्थांची परवड होत आहे. कोरोना काळात तरी काळजीपूर्वक कामाची सामान्यांचा माफक अपेक्षा असतानाही त्याचे गांभीर्य कोणालाच नाही. त्याबाबत अनेक तक्रारी आहेत. मात्र, तलाठ्यांच्या मनमानीला कोणीच रोखू शकत नाही, हेच वारंवार सिद्ध होत आहे. बळीराजा शेतकरी संघटनेने त्यांच्या मनमानी कारभाराच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना त्यावर योग्य पावले उचलावी लागतील. 

ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी यांचे हाल व नुकसान टाळण्यासाठी तलाठी सज्जे उभे केले. सोयी-सुविधायुक्त कार्यालये बांधली आहेत. मात्र, बहुतांशी तलाठी कार्यालयात बसून कारभार पाहातच नाहीत. शेतीसह अन्य कामांसाठी तलाठी कार्यालयातून सातबारा, खाते उतारा, विविध प्रकारचे दाखले, दाखले घेण्यासाठी ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. विद्यार्थी, नोकरदारांना विविध भरती प्रक्रियेसाठी प्रमाणपत्र, रहिवाशी, कुटुंब मर्यादा प्रमाणपत्र सागतात. ती कागदपत्रे मिळविण्यासाठी तलाठ्यांचा शोध सुरू असतो. तलाठी मात्र आज इथे तर उद्या तिथे अशा घिरट्या घालायला लावतात. तलाठ्यांचे मोबाईल बंद ठेवतात. कोतवालानाही व्यवस्थित माहिती सांगत नाही. परिणामी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. 

अनेक गावांत खासगी क्‍लार्क किंवा कोतवालावरच तलाठ्यांच्या कामांची जबाबदारी असते. कागद मिळतो, तलाठ्यांच्या स्वाक्षरीसाठी त्या संबंधितांना कऱ्हाड शहरात यावे लागते. विशेष म्हणजे येथे आल्यानंतरही मनमानीला सामोरे जावे लागते. मनमानी पद्धतीने पैसेही मागितले जातात. तलाठ्यांना हाताशी धरून कोतवालही गावातील शेतकरी, ग्रामस्थांकडून पैसे उकळत असल्याचे आरोप आहेत. तालुक्‍यातील तलाठी गावच्या सजांचा कारभार कऱ्हाडमधून करत आहेत. आण्णासाहेबांच्या मनमानी कारभारावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याचे दिसत आहे. 

""कऱ्हाड तालुक्‍यातील तलाठी नेमणुकीच्या गावात हजर नसतात. त्यांचा कारभार कऱ्हाडातून सुरू असतो. तलाठी कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांकडून मनमानी पद्धतीने पैसे उकळतात. तलाठ्यांच्या गैरहजेरीने शेतकरी, विद्यार्थी यांची अनेक कामे खोळंबली आहेत. त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. मनमानी पद्धतीने काम करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी.'' 

- उत्तमराव खबाले, 
बळीराजा शेतकरी संघटना, 
कऱ्हाड तालुकाध्यक्ष 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com