नवनिर्मितीसाठी खटावमध्ये एकवटली युवाशक्ती, वाचा नेमक काय केले उच्चविद्याविभूषितांनी

Satara
Satara

खटाव (जि. सातारा) : येथील चार उच्चविद्याविभूषित युवकांनी घाणीच्या साम्राज्याने किळसवाणा झालेला पोवई गणेश मंदिराच्या परिसराची श्रमदानाने स्वच्छता करून दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविक, विश्वस्त मंडळ, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. 

येथील एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेला प्रतीक पवार, त्याचे वर्गमित्र सूरज जाधव, अनिकेत यादव व खातगुण (ता. खटाव) येथील साहिल मुल्ला हे अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर लॉकडाउनच्या निमित्ताने रोज मैदानावर फिरण्यात व गप्पा मारण्यात वेळ घालवत असत. त्यांनी पोवई गणपती परिसरातही सायंकाळी पळण्याचा सराव सुरू केला. या दरम्यान हा परिसर कचऱ्याचे साम्राज्य बनत चाललेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या युवकांना ते पाहावले नाही. त्यांनी व्यायाम बंद करून कोणी येऊ अथवा न येऊ आपण या कामात स्वतःला झोकून देऊन हा परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते दररोज हा परिसर साफसफाई करत आहेत.

कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचे ग्लास, दारूच्या रिकाम्या बाटल्या, तुटलेल्या चपला आदी गोष्टींचा मोठ्या प्रमाणात भरणा दिसून आला. जवळपास दहा पोती कचरा गोळा केला आणि तितक्‍याच पटीने दुसऱ्या दिवशी तितकाच कचरा दिसून येत आहे. न खचता जोपर्यंत लॉकडाउन पूर्णपणे उठत नाही तोपर्यंत इथला परिसर स्वच्छ करण्याचा ध्यास या युवकांनी घेतला आहे. त्याचबरोबर या परिसरात देशी झाडांच्या बियांची लागवड करण्याचा विचार ते करू लागले आहेत. 
पोवई गणेश मंदिरात काही जण केवळ "श्रीं'चे दर्शन घेणे एवढ्या पवित्र हेतूने येतात. मात्र, अलीकडच्या काळात या परिसरात व्यसनी, प्रेमीयुगुलांचा वावर वाढत असल्याने वातावरण दूषित होऊ लागलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर देवस्थानचे विश्वस्त मंडळ, लोकप्रतिनिधी, पोलिसांनी याबाबतीत वेळीच पावले उचलून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भक्तगणांकडून होत आहे. 


""जोपर्यंत आम्ही गावी आहोत, तोवर स्वच्छता करणार आहोत. यामध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा आहे, त्यांचे स्वागत असेल. हळूहळू आम्ही या परिसरात स्वखर्चाने नवनवीन उपक्रम राबवणार आहोत.'' 

- डॉ. प्रतीक पवार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com