सातबारा उताऱ्यांवर "ध'चा "मा'! चुकांमुळे नागरिक त्रस्त

अरुण गुरव
Sunday, 25 October 2020

पाटण तहसील कार्यालयाने या प्रश्‍नाची दखल घेऊन शासनस्तरावर दुरुस्ती मोहीम राबवून सातबारा उतारा व नकाशे यामधील दुरुस्ती करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

मोरगिरी (जि. सातारा) : संगणकीकृत सातबारा उताऱ्यांवर "बाई'च्या ऐवजी "ताई' झाले आहे. काही ठिकाणी "ध' चा "म' झाला आहे. दस्त नोंदणीनंतर फेरफार उतारा केल्यावर चुकीची नावे येणे, सातबारा उतारा तयार झाल्यावर त्यावरील नावे गायब होणे, असे प्रकार पाहण्यास मिळत आहेत. छोट्या चुकांमुळे नागरिकांना शासकीय काम करताना अडचणी येत आहेत. त्यात त्यांचा बराच पैसा व वेळ वाया जात आहे. काही तर घरातल्या लोकांनी हा प्रकार केल्याचे समजून कुटुंबांत वादाचे प्रसंग घडू लागले आहेत. 

सातबारा उतारा मालकी हक्काचा पुरावा, तर हद्द कायम करण्यासाठी नकाशांचे महत्त्व आजही अनन्यसाधारण आहे. संगणकीकृत कागदपत्रे तयार करताना सातबारा आणि फेरफार उताऱ्यांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. त्यानंतर ते उतारे बनवण्यात आले असले तरी यामध्ये अनेक चुका झालेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना कारण नसताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. संगणकीकृत सातबारा उतारे वगैरे केल्यानंतर चावडी वाचन करून जरी दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली असली तरी कामानिमित्त परगावी असणाऱ्या लोकांना याची कल्पना नसल्याने नागरिकांना कारण नसताना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

खासगी शाळांची पालकांना दमदाटी, शुल्क जमा करण्याचे नोटीस 

हद्द कायम करण्यासाठी नकाशांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अतिक्रमण काढण्यासाठी लागणारे गाव नकाशे, फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे, गट नंबर यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका आहेत. अतिक्रमण काढताना किंवा हद्द कायम करताना या अनंत अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पाटण तहसील कार्यालयाने या प्रश्‍नाची दखल घेऊन शासनस्तरावर दुरुस्ती मोहीम राबवून सातबारा उतारा व नकाशे यामधील दुरुस्ती करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

बिहारला महागठबंधन विजयी होईल; काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा 

चुका तुम्ही करायच्या आणि दुरुस्ती आम्ही! 

सातबारा उताऱ्यांवरील चुका दुरुस्त करण्यासाठी तहसीलदारांना अर्ज करावा लागेल, असे तलाठी सांगत आहेत. शासनाकडून झालेल्या चुका शासनाने दुरुस्त करण्यास अडचण काय असावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चुका तुम्ही करायच्या आणि दुरुस्ती आम्ही करायची, याबाबत सामान्य जनतेत खंत व्यक्त केली जात आहे. 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satbara Mistakes Should Be Corrected Says Patan Citizens Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: