
Satara News : तांबेंच्या विजयाचा युवक कॉंग्रेसला आनंद; कऱ्हाडात झळकले अभिनंदनाचे बॅनर
कऱ्हाड : युवक काँग्रेसच्या अध्यक्षालाच कॉंग्रेसने तिकिट न दिल्याने आणि भाजपनेही तांबेंना पाठिंबा दिल्याने ही निवडणुक राज्यात लक्षवेधी ठरली होती. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी विजयश्री खेचून आणत तांबे कुटुंबाचे राजकारणातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
दरम्यान युवक कॉंग्रेसच्या युवकांनी तांबेंनाच आपला पाठिंबा दिला असल्याचे आता स्पष्ट होत आहे. कऱ्हाड (जि.सातारा) शहरात तांबे यांच्या विजयाचे बॅंनर चक्क येथील युवक कॉंग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी लावले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्यच व्यक्त होत आहे.
काँग्रेस विचारांच्या जडणघडणीत वाढलेल्या सत्यजीत तांबे यांचा राजकीय प्रवास 22 वर्षांचा असला तरी एखाद्या मुरब्बी राजकीय नेत्या प्रमाणे त्यांची वाटचाल सुरु ठेवली आहे. त्यांच्या बंडखोरीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते.

68 हजार 999 मत मिळवणारे सत्यजीत तांबे 29 हजार 465 मताधिक्याने विजयी झाले. शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा त्यांनी पराभव केला. तांबे यांच्या विजयात भाजपचा हातभार असला तरीही जाहीरपणे पाठिंबा देता आला नाही ते कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
या निवडणुकीच्या मैदानापासून दूर मुबंईत उपचार घेणारे बाळासाहेब थोरात हेही या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते. काँग्रेसच्या ज्या नेत्यांना बाळासाहेब स्पर्धक वाटतात त्यांनी बाळासाहेबांना लक्ष करणायचा शेवट पर्यंत प्रयत्न केला.
काँग्रेसमधून भाजपात आलेले आणि आपले चांगले बस्तान बसवणार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तांबेंना पाठिंबा तर दिला, मात्र बाळासाहेब थोरात यांना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. तांबे यांची पुढची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट नाही.
आधी निलंबन केले आणि आता विजय झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षात सन्मानाने घेण्याचा निर्णय घेतला तरी सत्यजित जाणार का? सत्यजित काँग्रेसमध्ये गेले तर त्यांच्या विजयात मोठा वाटा उचलणाऱ्या भाजपची भूमिका काय राहणार हा पेच कायम आहे.
दरम्यान राज्यातील युवक कॉंग्रेसच्या युवकांनी सत्यजित तांबेंनाच आपला पाठिंबा दिला असल्याचे सध्या दिसत आहे. त्यातुनच शहरात तांबे यांच्या विजयाचे बॅंनर मोठ्या प्रमाणावर झळकू लागले आहेत.
शहरातील चौकात सत्यजीत तांबे मित्र परिवाराकडून अभिनंदनांचे फलक झळकवण्यात आले आहेत. ढेबेवाडी फाटा येथे युवक कॉंग्रेसच्या अभिजीत पाटील व राहूलराज पवार यांनी अभिनंदनाचे फलक लावले आहेत. त्यामुळे तांबेंच्या विजयाचे युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आनंद झाला आहे.
युवकांचे नेतृत्व आमदार झाल्याचा आनंद सर्व सामान्य कुटुंबातील युवकाला राजकारणाच व्यासपीठ मिळवून देणारे नेतृत्व आमदार झाले याचा आनंद आहे, असे सांगुण कऱ्हाड दक्षिण युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अभिजीत पवार म्हणाले, गेली अनेक वर्षे आम्ही सत्यजीत तांबे यांच्यासोबत काम करतोय.
सन 2011 साली आमच्या चचेगावला आमचे नेते युवक कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी भेट घडवून दिली. सत्यजित तांबे हे आगामी काळात ते युवकांच्या व पदवीधरांच्या प्रश्नासाठी आवाज उठवतील. शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात आम्ही सत्यजित तांबे यांच्यासोबत काम करू.