पाटणचा राजकीय इतिहास निष्ठा, विश्वास आणि परंपरेचा : सत्यजितसिंह पाटणकर

जालिंदर सत्रे
Saturday, 28 November 2020

पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या काळात एकदिलाने काम करा. शहराचा सर्वांगीण विकास हेच धोरण आणि शेवटच्या घटकांपर्यंत सुविधा पोचविणे हेच आपले काम चोख पार पाडावे असे आवाहन सत्यजितसिंह पाटणकर यांनी नव्या पदाधिका-यांना केले.

पाटण (जि.सातारा) : पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी बिनविरोध झाल्या. नगराध्यक्षपदी अजय कवडे यांची व उपाध्यक्षपदी विजय ऊर्फ बापू टोळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी श्रीरंग तांबे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली.
 
नूतन पदाधिकाऱ्यांचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पुष्पहार देऊन स्वागत केले. या वेळी मावळते नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपाध्यक्ष सचिन कुंभार, माजी नगराध्यक्षा सुषमा महाजन, माजी उपनगराध्यक्ष दीपक शिंदे, किरण पवार, नगरसेविका सरस्वती खैरमोडे, अनिता देवकांत, रश्‍मी राऊत, योगिता कुंभार, प्राजक्ता भिसे, संगीता जाधव, संगीता चव्हाण, स्वीकृत नगरसेवक उमेश टोळे, सचिन देसाई आदी उपस्थित होते.
 
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, ""पाटण शहराचा राजकीय इतिहास हा निष्ठा, विश्वास आणि परंपरेचा आहे. स्थानिक पातळीवर राजकारण असो अथवा समाजकारण एकमेकांच्या हातात हात घालूनच आपण आजवर यशस्वी झालो आहोत. मावळते नगराध्यक्ष संजय चव्हाण व उपाध्यक्ष सचिन कुंभार यांनी आपली कारकीर्द यशस्वी करत मोठ्या मनाने राजीनामा दिला.

नगराध्यक्ष म्हणून अजय कवडे व उपाध्यक्ष म्हणून विजय टोळे यांची निवड बिनविरोध करताना नगरसेवक, नगरसेविकांचेही योगदान आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या काळात एकदिलाने काम करा. शहराचा सर्वांगीण विकास हेच धोरण आणि शेवटच्या घटकांपर्यंत सुविधा पोचविणे हेच आपले काम चोख पार पाडावे.''

..अखेर पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी उदयनराजेंची भूमिका जाहीर; या पक्षाला मिळणार पाठबळ!

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satyajitsinh Patankar Congratulated President And Vice President Of Patan Satara News