esakal | साताऱ्यात २८८ विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे
sakal

बोलून बातमी शोधा

self defence

साताऱ्यात २८८ विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे

sakal_logo
By
- प्रवीण जाधव

सातारा : दुर्गोत्सवाचे औचित्य साधून महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हा पोलिसांच्या भरोसा सेलतर्फे १२ दिवसांचा स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील विविध शाळांतील २८८ विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे मिळाले.

राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासनाकडून धोरण आखण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा पोलिस दलाकडून महिला सुरक्षेचा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यामध्ये महिला व मुलींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजना व धोरणांची आखणी केली जात आहे.

या कार्यक्रमाचाच एक भाग हा मुलींना आत्मसंरक्षणासाठी सक्षम करण्याचा आहे. स्त्रीशक्तीचा उत्सव असलेल्या दुर्गोत्सवाच्या निमित्ताने याची आखणी करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी भरोसा सेलच्या सहायक पोलिस निरीक्षक अनिता आमंदे-मेणकर यांना दिले होते. त्यानुसार सातारा शहरातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याच्‍या शिबिराची आखणी करण्यात आली होती. त्यामध्ये शहरातील सुशीलादेवी गर्ल्स हायस्कूल, अनंत इंग्लिश स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, श्रीपतराव पाटील हायस्कूल (करंजे) या शाळांमध्ये मुलींसाठी १२ दिवसांचे स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शहरातील २८८ मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले.

१२ दिवसांच्या या प्रशिक्षणाचा समारोप काल पोलिस करमणूक केंद्रात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या वेळी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ, भरोसा सेलच्या अनिता मेणकर, राखीव पोलिस निरीक्षक बी. टी. अलदार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

आणखी शिबिराची आखणी

पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा शहरात शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला. त्याचप्रमाणे सातारा शहराबरोबरच जिल्ह्यातील अन्य भागांमध्येही मुलींना सक्षम करण्यासाठी अशा शिबिरांचे आगामी काळात आयोजन करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केले आहे.

loading image
go to top