मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी शिवसेनाप्रमुखांनी वक्‍तृत्वाची तलवार अखेरपर्यंत तळपत ठेवली : शंभूराज देसाई

हेमंत पवार
Sunday, 24 January 2021

पक्षाची धुरा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. ते कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.

कऱ्हाड : शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त दौलतनगर (ता. पाटण) येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त पाटण मतदारसंघातील गरजू कुटुंबातील महिलांना आणि लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना कार्यस्थळावरील ऊसतोडणी मजुरांच्या कुटुंबीयांना मंत्री देसाईंच्या हस्ते जीवनावश्‍यक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
 
दौलतनगर येथे आयोजित कार्यक्रमास शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले, ""शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले होते. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्‍तृत्वाची तलवार अनेक वर्षे तळपती ठेवली. त्यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगचित्रातून टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती त्यांच्या लेखणीत व प्रखर वक्‍तृत्वात होती.

मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून अविरतपणे चालविला आणि पार पाडला. आज ते हयात नाहीत; परंतु त्यांनी दिलेल्या आदर्श विचारांतून शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. पक्षाची धुरा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. ते कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांनी माझ्यावर राज्यातील महत्त्वाच्या पाच खात्यांची दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे.'' 

शिवेंद्रसिंहराजे बारामतीत भेटले पवारांना; नवीन राजकीय समीकरणे उदयास?

इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया अंतर 29 दिवसांत पुर्ण करणा-या सुफियाची आज अजिंक्यता-याला गवसणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shambhuraj Desai Bal Thackreay Birth Anniversary Satara Marathi News