
या बैठकीत श्री. पवार यांनी मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यांपुढे एकूणच प्रकरणाबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली, तसेच झाडाझाडी झाल्याचेही समजते. दरम्यान, याबाबतची नेमकी माहिती मिळावी, यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
सातारा : रयत शिक्षण संस्थेत सध्या प्राचार्यपदावर कार्यरत, मात्र पूर्वी संस्थेचे सचिवपद भूषविलेल्या दोघांचे राजीनामे संस्थेकडून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात रयत शिक्षण संस्थेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मॅनेजिंग कौन्सिलची बैठक गुरुवारी साताऱ्यात झाली. या बैठकीतही या विषयावर चर्चा झाल्याचे समजते.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ तसेच मुंबई विद्यापीठ अशा विविध विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षी प्राध्यापकांची भरती झाली होती. त्या वेळी निवड समितीत अनेक प्राचार्यांचा समावेश होता. संस्थेत काम केलेल्यांची सेवा ज्येष्ठता डावलून इतर उमेदवारांचीच प्राध्यापकपदी निवड समितीतील सदस्यांनी वर्णी लावली होती. त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा होती. याबाबतच्या तक्रारी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेल्या होत्या. त्या तक्रारींची शहानिशा करून श्री. पवार यांनी काल माजी सचिव व नगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांचा राजीनामा घेतला होता. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार गुरुवारी सकाळी सांगलीला जाताना साताऱ्यात थांबले. त्यांनी संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात घेतली. या बैठकीत नवीन शैक्षणिक धोरण आणि संस्थेतील अडीअडचणी, प्रगती याबाबत चर्चा केली. त्यानंतर श्री. पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकासचा फॉर्म्युला नसेल : जयंत पाटील
या बैठकी दरम्यान श्री. पवार यांनी माजी सचिव व पाचवड (ता. वाई) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांचाही राजीनामा घेतला. संस्थेतील विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. ही बैठक तब्बल तीन तास सुरु होती. या बैठकीत श्री. पवार यांनी मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यांपुढे एकूणच प्रकरणाबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली, तसेच झाडाझाडी झाल्याचेही समजते. दरम्यान, याबाबतची नेमकी माहिती मिळावी, यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
डॉ. कराळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ""आपण तीन महिन्यांपूर्वीच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला असून, संस्थेकडून त्याबाबतचा कोणताही निर्णय मला अद्याप कळविण्यात आलेला नाही.'' प्राचार्य डॉ. बुरुंगले म्हणाले, ""होय, आज मी राजीनामा दिलेला आहे. काही गट-तट आहेत. माझ्यावर ठपका काय आहे, ते संस्थाच सांगू शकेल; पण मला ताणतणाव काही नको होते. मी राजीनामा दिला आहे.''
शरद पवार नेहमीच आधुनिक शिक्षणासाठी आग्रही : डाॅ. अनिल पाटील
Edited By : Siddharth Latkar