उदयनराजेंचा आधार घेत पवारांचा मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न : शशिकांत शिंदे

उमेश बांबरे
Thursday, 3 December 2020

मंडल आयोगाचा आधार घेत "बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला...' असे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांचा बोलविता धनी दुसराच कोणीतरी आहे.

सातारा : मराठा महासंघाचे नेते ऍड. शशिकांत पवार यांनी आरक्षण प्रश्‍नावर कधीही परखड भूमिका घेतलेली नाही. आता त्यांनी खासदार उदयनराजेंना सोबत घेऊन त्यांच्या नावाचा वापर करत मराठा आंदोलन व मंडल आयोगाचा आधार घेत "बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला...' असे आव्हान देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांचा बोलविता धनी दुसराच कोणी तरी असून, "स्ट्रॉंग मराठा' नेत्याला लक्ष करण्याचा प्रयत्न कोणाच्या तरी सांगण्यावरून ते करत आहेत, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी येथे दिले.

मराठा महासंघाचे नेते ऍड. शशिकांत पवार व खासदार उदयनराजेंनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या आरोपाचे खंडण करत श्री. शिंदे यांनी पत्रकाद्वारे त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला आहे. (कै.) अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून मोठे आंदोलन केले. त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला एकत्र केले. 1982 मध्ये मराठा आरक्षणाची बीजे रोवली गेली. या आंदोलनात ऍड. शशिकांत पवार हेही सहभागी होते.

अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर नेतृत्व एवढे सक्षम होते, तर मराठा महासंघ पुढे ताकदीने का चालवू शकला नाही, याचे उत्तर पवार यांनी द्यावे, असे श्री. शिंदे यांनी म्हटले आहे. मंडल आयोगाची चर्चा करताना 20 वर्षांपासून या विषयावर तुम्ही एक चकार शब्द का काढला नाही? दरम्यानच्या काळात तुम्ही शरद पवार यांच्याकडे सातत्याने येत होता, भेटत होता. त्या वेळी शरद पवार यांच्यापुढे तुम्ही का तक्रारी मांडल्या नाहीत? आदी प्रश्‍न शिंदे यांनी उपस्थित केले आहेत. 

ते म्हणाले, ""मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सगळे नेते बाजूला झाले. सामान्य कार्यकर्त्यांनी नेतृत्व करून देशाला दिशा दाखविणारे आंदोलन झाले. नेतृत्वाविना हे आंदोलन शांततेत करण्याचा इतिहास घडला व सरकारवर दबाव वाढला. आता या प्रश्‍नावर वेगवेगळी भूमिका मांडून शशिकांत पवार हे मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

हे सर्व ठरवून चाललं आहे भाजपवर; शशिकांत शिंदेंचे शरसंधान 
 
शशिकांत पवार यांनी आरक्षण प्रश्‍नावर कधीही परखड भूमिका मांडली नाही; पण त्यांनी उदयनराजेंना सोबत घेऊन त्यांच्या नावाचा वापर करत मराठा आंदोलनाचा व मंडल आयोगाचा आधार घेत "बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला...' असे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांचा बोलविता धनी दुसराच कोणीतरी आहे.

#MarathaReservation : बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला; उदयनराजेंचा शरद पवारांवर राेख 
 

"स्ट्रॉंग मराठा' नेत्याला लक्ष करण्याचा प्रयत्न ते कोणाच्या तरी सांगण्यावरून करत आहेत. हे सर्व होताना मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या ताकदीवर सरकारला निर्णय घेणे भाग पडू. मराठा समाजाच्या या ताकदीचा ऍड. शशिकांत पवार यांनी फायदा घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करू नये. 

आमदार शशिकांत शिंदे

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shashikant Shinde Criticised Shashikant Pawar On Maratha Reservation Issue Satara News