
Satara News : नव्या एमआयडीसीसाठी इच्छुकांच्या जमिनी घेणार!
सातारा : सातारा येथील वर्णे, निगडी येथील इच्छुक शेतकऱ्यांच्या पडीक, माळरान जमिनी योग्य मोबदला देऊन अधिग्रहण करून नवीन एमआयडीसी सुरू करणे, तसेच नवीन उद्योग उभारून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हिरवा कंदील दिला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार उद्योग विभाग, एमआयडीसीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहेत.
सातारा औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार मंत्रालयातील त्यांच्या दालनात उद्योग खात्याचे सचिव, उद्योग विभाग व एमआयडीसीचे सर्व वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी यांच्यासोबत नुकतीच संयुक्त बैठक झाली.
या बैठकीत सातारा जिल्ह्यातील उद्योजकांच्या वतीने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर प्रश्न, समस्या व विषय मांडले. यावेळी मास अध्यक्ष राजेंद्र मोहिते, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, सचिव धैर्यशील भोसले, खजिनदार भरत शेठ आदी उपस्थित होते. सातारा शहर व जिल्ह्यात सुमारे १३ औद्योगिक क्षेत्र कार्यान्वित आहेत व ८ नवीन सुरू होणारी प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रे आहेत. त्यामुळे सातारा येथे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी व कार्यकारी अभियंता कार्यालय सुरू करण्याचा निर्णय बैठकीत झाला.
हॉस्पिटलसाठी पाच एकर जागा
केंद्र शासनाने जिल्ह्याकरिता १०० बेडचे कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) हॉस्पिटल मंजूर केले असून, त्यासाठी सातारा औद्योगिक क्षेत्रातील शासकीय पाच एकर जागा सदर हॉस्पिटलकरिता देण्यात यावी, असे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार बैठकीत अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही सुरू केली.