डोंगराळ भागात युवकांनी फुलविली बाग; शिवप्रेमी प्रतिष्ठानचा उपक्रम

प्रशांत घाडगे
Thursday, 3 December 2020

पावसाळ्याच्या दिवसात रोपे लावल्याने त्याची उत्तम प्रकारे उगवण झाली. आता पावसाचा कालावधी संपल्याने युवक झाडांना बादलीने पाणी घालत होते.

सातारा : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरातील विलासपूर येथील सहजीवन सोसायटीमधील शिवप्रेमी प्रतिष्ठानमधील तरुणांनी डोंगरात विविध जातींच्या रोपांचे संगोपन करून बाग फुलवली आहे. या ठिकाणी रोपांना पाणी घालण्यासाठी तरुणांनी ठिंबक सिंचनचाही प्रयोग केल्याने वाढत्या उष्णतेतही रोपांचे संवर्धन अधिक चांगल्या पध्दतीने होत आहे. 

शहर व परिसरात झाडांची कत्तल करून सिमेंटची जंगले उभी राहताना दिसत आहेत. मात्र, शहरालगत असलेल्या डोंगर परिसरातील शिवप्रेमी प्रतिष्ठानमधील तरुणांनी मागील सहा महिन्यांपूर्वी आवळा, गुलमोहर, सप्तपर्णी, सोनचाफा, जांभूळ, उंबर, वड, पिंपळ, पेरू, नारळ, बदाम व इतर विविध जातींच्या रोपांची लागवड केली. या ठिकाणचा भाग खडकाळ असूनही तरुणांनी परिश्रम घेऊन दोन ते अडीच फुटांचे खड्डे खणून झाडे लावली. पावसाळ्याच्या दिवसात रोपे लावल्याने त्याची उत्तम प्रकारे उगवण झाली. आता पावसाचा कालावधी संपल्याने युवक झाडांना बादलीने पाणी घालत होते. मात्र, मागील काही दिवसांत तरुणांनी पाण्याची बचत करण्यासाठी ठिंबक सिंचनची जोडणी केली आहे. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा झाडांना पाणी मिळत असल्याने झाडांचे संवर्धन उत्तम प्रकारे होत आहे.

स्ट्रॉबेरीसह आता महाबळेश्वरची 'केशर' ही लवकरच मिळणार
 

""डोंगराळ भागात जून महिन्यात रोपांची लागवड करण्यात आली. सुरुवातीला रोपांची बांधणी करताना परिश्रम घ्यावे लागले. मात्र, सद्य:स्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ठिबक सिंचनाद्वारे झाडांना पाणी सुरू केले आहे. तसेच झाडांच्या वाढीसाठी विविध प्रकारच्या खतांचा वापर करण्यात आला आहे.'' 
-सूरज कदम, तरुण

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivpremi Pratishtan Tree Plantation Activity Satara News