माणदेशी फाउंडेशनचे गोंदवल्यातील कोविड सेंटर रुग्णांना आधार : नीलम गोऱ्हे

फिरोज तांबोळी
Wednesday, 28 October 2020

रुग्णांचे हाल होता कामा नयेत, यासाठी कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. हे कोविड केअर सेंटर तात्पुरते न राहता गंभीर रुग्णांसाठी याचा कायमस्वरूपी उपयोग होईल असा विश्वास चेतना सिन्हा यांनी व्यक्त केला.

गोंदवले (जि. सातारा) : माणदेशी फाउंडेशनच्या वतीने गोंदवल्यात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या माध्यमातून माणमधील ग्रामीण भागातील रुग्णांना "आपले गाव आपले सरकार'प्रमाणे आधार मिळेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
 
एचएसबीसी बॅंक व सिपला फाउंडेशनच्या आर्थिक सहयोगातून माणदेशी फाउंडेशनचे वतीने गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात 50 लाख रुपये खर्चून कोविड सेंटर उभारले आहे. या कोविड सेंटरचे ऑनलाइन उद्‌घाटन गोऱ्हे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रांताधिकारी शैलेंद्र सूर्यवंशी, माणदेशी बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, गटविकास अधिकारी संभाजीराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, विजय सिन्हा, डॉ. के. पी. कदम, डॉ. अमित पाटील, सरपंच अजय पोळ, ऍड. प्रभाकर कारंडे आदी उपस्थित होते.

पुण्यातील सातारकरांसाठी एसटीची खूषखबर

एचएसबीसी बॅंकेच्या अलोका मुजुमदार यांची ऑनलाइनच्या माध्यमातून उपस्थिती होती. गोऱ्हे म्हणाल्या, ""श्री ब्रह्मचैतन्य महाराजांमुळे गोंदवले बुद्रुक प्रसिद्ध आहे; परंतु भविष्यात आरोग्य उपचारासाठी गोंदवले खुर्द प्रसिद्ध होईल. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा उभारून रुग्णांची अडचण दूर होणार असल्याने माझ्या आमदार फंडातून या सेंटरसाठी 12 लाख रुपये रुग्णवाहिकेसाठी देणार आहे. ''
 
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ""माण तालुक्‍यात अत्याधुनिक सुविधांयुक्त कोविड सेंटरमुळे खूप चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. भविष्यात लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे सेंटर खूप उपयोगी पडेल.''
 
अलोका मुजुमदार म्हणाल्या, ""कोरोना काळात अत्यावश्‍यक तिथे मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांसाठी माणदेशी खूप चांगले काम करत आहे.''

लग्नाअगोदर बारसे घालायची अनेकांना घाई; जयकुमार गाेरेंचा 'राष्ट्रवादी'ला टाेला

चेतना सिन्हा म्हणाल्या, ""रुग्णांचे हाल होता कामा नयेत, यासाठी कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. हे कोविड केअर सेंटर तात्पुरते न राहता गंभीर रुग्णांसाठी याचा कायमस्वरूपी उपयोग होईल.'' प्रभात सिन्हा यांनी प्रास्ताविक केले. या वेळी या कोविड सेंटरसाठी स्वतः हून वेळ देणारे डॉ. अमित पाटील यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Leader Neelam Gorhe Inaugurated Gondavale Covid Center Satara News