esakal | शिवसैनिक सक्षम; सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवणार : उदय सामंत
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसैनिक सक्षम; सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवणार : उदय सामंत

प्रत्येक पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही तयारी करणार आहोत. त्यासोबतच पक्षाची ताकद वाढवून निवडणुका लढल्या जातील. त्यासाठी स्थानिक नेते जी रणनीती ठरवतील, त्याला माझा पाठिंबा असेल असे मंत्री उदय सामंत यांनी नमूद केले.

शिवसैनिक सक्षम; सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवणार : उदय सामंत

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्षम असून येथे कोणतीही गटबाजी नाही. त्यामुळे आगामी काळात येथील कार्यकर्त्यांना प्रशासकीय व पक्षीय ताकद दिली जाईल. मंत्रालय स्तरावरील प्रश्‍नही प्राधान्याने सोडविले जातील. त्यासोबतच यापुढे ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंतच्या सर्व निवडणुका शिवसेना लढणार असून त्यासाठी स्थानिक नेते जी रणनीती ठरवतील, त्याला माझा पाठिंबा असेल, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी दिली.
 
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच मंत्री सामंत रविवारी साताऱ्यात आले होते. येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्यासह सर्व जिल्हाप्रमुख उपस्थित होते.

निष्ठावंतांना न्याय, गद्दारांना धडा शिकवू : मंत्री सामंत साताऱ्यात गरजले
 
उदय सामंत म्हणाले, ""सीमा भागात आज काळा दिवस पाळण्यात आला. सीमा भागातील लोकांसोबत आम्ही सर्व जण आहोत, हे दाखविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना काळ्या फिती लावण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आम्ही सर्व मंत्र्यांनी काळ्या फिती लावून काळा दिवस पाळला. सीमा भाग महाराष्ट्रात येणार नाही, हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य बालिशपणाचे असून कर्नाटकात बेळगावचे बेळगावी झाले असले तरी महाराष्ट्रात बेळगावच असेल.'' साताऱ्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सक्षम आहेत. आम्ही मंत्री देसाई यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासाचा वाटा साताऱ्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करू. जिल्हा शिवसेनेत कोणतीही गटबाजी नाही. आमच्या पक्षात पक्षप्रमुख हेच नेते आहेत. येथे गटबाजीला थारा नाही. कोकणातून साताऱ्यात येऊन मला कोणतीही निवडणूक लढायची नाही. ज्यांनी स्वकष्टातून शिवसेना उभी केली आहे, त्या सर्व कार्यकर्त्यांना प्रशासकीय आणि पक्षीय ताकद दिली जाणार आहे, अशी हमी त्यांनी दिली.
 
साताऱ्यातील पदाधिकारी सक्षमतेने काम करत असल्याने त्यांच्यासाठी मी वेगळा काही फॉर्म्युला आणला तर सर्व जण त्यातच अडकतील. एकाच दिवशी 448 शाखांचे व रक्तदान शिबिरे घेणाऱ्या जिल्हा शिवसेनेचे काम चांगले असून येथील महिला आघाडी तसेच युवा सेनेचेही काम चांगले आहे. त्यामुळे मंत्री देसाईंच्या नेतृत्वाखाली चांगल्या पध्दतीने समन्वय राखून काम केले जाईल, अशी माहिती देऊन ते म्हणाले,"" प्रत्येक पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही तयारी करणार आहोत. त्यासोबतच पक्षाची ताकद वाढवून निवडणुका लढल्या जातील. त्यासाठी स्थानिक नेते जी रणनीती ठरवतील, त्याला माझा पाठिंबा असेल.''

Edited By : Siddharth Latkar