गरिबीचे चटके सोसलेल्या युवा उद्योजकाने 50 कुटुंबीयांत फुलवला प्रकाश

जगन्नाथ माळी
Sunday, 15 November 2020

कोरोना पार्श्वभूमीवर गरिबांची अवस्था काय झाली असेल हे त्यांनी जवळून पाहिले आहे. अशा वेळी या गरिबांच्या जीवनात दिवाळीचा आनंद निर्माण व्हावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

उंडाळे (जि. सातारा) : गरिबीचे चटके सोसत जीवनात स्थिरस्थावर झालेल्या येथील युवा उद्योजक सुभाष डांगे यांनी गरिबीमुळे आणि त्यातच आलेल्या कोरोना संकटाने दिवाळी साजरी करू शकत नसलेल्या सुमारे 50 कुटुंबीयांना दिवाळी साहित्याचे किट देत गरिबीच्या अंध:कारात सामाजिक बांधिलकीचा दीप लावून घरात दिवाळीचा प्रकाश फुलवला आहे.
 
गरिबीचे चटके सोसत स्वतःच स्वतःच्या कष्टाने मोठे होत येथील सुभाष डांगे हे एक चांगले मसाला व्यावसायिक म्हणून उदयास आले. मुंबईतील पनवेल येथे त्यांचे सुसज्ज असे मसाला विक्रीचे दुकान आहे. त्यातून पुढे जाऊन त्यांनी त्यांचा भाऊ रमेश यालाही या व्यवसायामध्ये आणले. आता हे दोघे व्यवसाय चालवत आहेत. अशा प्रकारे गरिबीशी दोन हात करत आज यशस्वी झालेल्या श्री. डांगे यांनी गरिबी काय असते याची जाणीव आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गरिबांची अवस्था काय झाली असेल हे त्यांनी जवळून पाहिले आहे. अशा वेळी या गरिबांच्या जीवनात दिवाळीचा आनंद निर्माण व्हावा, या उदात्त हेतूने त्यांनी गावातील 50 कुटुंबीयांना चिवडा, चकली, मसाला, साबण, सुगंधित उटणे, सुगंधी तेल, पोहे, रवा, मैदा, पणत्या, रांगोळी आदी साहित्याचे वाटप करून गरिबांबद्दल असणारी अस्था दाखवून दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.

लालचुटूक स्ट्रॉबेरी चाखत पर्यटक लुटताहेत पाचगणी- महाबळेश्वरात दिवाळी सुटीचा आनंद
 
याविषयी श्री. डांगे म्हणाले, ""गरिबी काय असते हे मी जवळून पाहिले आहे. कोरोनासारख्या महामारीत गरिबाची दिवाळी उत्तम प्रकारे साजरी व्हावी हा हेतू मनामध्ये ठेऊन आपल्या गावातील जवळपास 50 कुटुंबांना दीपावली सणाचे साहित्य देऊन त्यांच्या दिवाळीच्या आनंदामध्ये मी सहभागी झालो आहे, याचा मला खूप- खूप आनंद वाटत आहे.''

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shubhas Dange Distributed Sweets To Undale Villagers Diwali Festival 2020 Satara News