कोपर्डे हवेलीची सिद्धनाथ यात्रा प्रथमच रद्द; ग्रामस्थांचा कौतुकास्पद निर्णय

जयंत पाटील
Saturday, 21 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच यात्रा रद्द होत असून खेळणी, पाळणे, मेवामिठाई, रथोत्सव व पै पाहुण्यांविना साध्या पद्धतीने होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे पोलिस उपनिरीक्षक दळवी यांनी सांगितले.

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील सिद्धनाथ देवाची यात्रा ग्रामस्थांच्या बैठकीत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी पोलिस उपनिरीक्षक यु. बी. दळवी, बीट हवालदार महेश लावंड, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, माजी उपसरपंच लालासाहेब चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, माजी पोलिस पाटील प्रल्हाद पाटील, एस. डी. चव्हाण, संभाजी चव्हाण, उत्तम चव्हाण, रामचंद्र पाटील, भीमराव चव्हाण, एम. बी. चव्हाण, भरत चव्हाण, विजय चव्हाण, प्रकाश पाटील, शिवाजी चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
प्रारंभी गेल्या वर्षीचा जमाखर्च, ताळेबंद सुदाम चव्हाण यांनी मांडला. या वेळी अनेक ग्रामस्थांनी बैठकीत सहभाग घेतला. त्यात एकमुखाने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये खेळणी, पाळणे, मेवामिठाई दुकानांना गावात बंदी घालण्यात आली आहे, तसेच रथोत्सव रद्द करण्यात आला असून, रथ व सासनकाठी मंदिराजवळ एकाच ठिकाणी उभा करून ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्स ठेऊन व मास्कचा वापर करूनच दर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी पै-पाहुण्यांना निमंत्रण देऊ नये, असे आवाहनही करण्यात आले. 

नारदमुनींच्या रुपात सिध्दनाथाचा अवतार; आकर्षक पूजेने वेधले लक्ष

तसेच सिद्धनाथ मंदिरात होणारा तुलसी विवाह सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय झाला. ग्रामस्थ, महिलांनी शिवारातील बन परिसरातील सिद्धनाथाचे सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत गर्दी न करता सोशल डिस्टन्स ठेऊन दर्शन घेण्याचे ठरले आहे. कोपर्डे हवेलीतील सिद्धनाथ देवाची मोठी यात्रा भरते. या यात्रेकडे परिसरातील लोकांच्या नजरा लागलेल्या असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच यात्रा रद्द होत असून, खेळणी, पाळणे, मेवामिठाई, रथोत्सव व पै पाहुण्यांविना साध्या पद्धतीने होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. पोलिस प्रशासनाचे सहकार्य राहील. त्याबरोबर ग्रामस्थांनी देखील मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स ठेवावा व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक दळवी यांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddhanath Yatra Of Koparde Haveli Canceled For The First Time Satara News