स्वच्छता गीताचे रचनाकार सिराजुद्दीन मोमीन हरपले

सचिन शिंदे
Monday, 14 September 2020

ओ भाऊ, ओ अक्का जरा इकडे लक्ष द्या ना.... अशा त्या गीताची दिलखेचक रचना केल्याने नागरिकांनाही ते गीत अत्यंत पसंत पडले.
 

कऱ्हाड : स्वच्छ सर्वेक्षणात एक लाख लोकसंख्येच्या पालिकांमध्ये देशामध्ये कऱ्हाड पालिकेने सलग दोन वर्षे पहिला क्रमांक पटकावला. त्यासाठी अनेकांचे हात झटले आहे. त्यातीलच सिराजुद्दीन बाबालाल मोमीन यांचे नावही अत्यंत महत्त्वाचे आहे. पालिकेच्या 30 पेक्षाही जास्त घंटागाड्या सकाळी शहरात फिरतात. त्या प्रत्येक गाडीवर...ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करू चला.... असे लयबद्ध स्वच्छता गीत सहज ओठावर गुणगुणले जाते. त्याचे गीतकार सिराजुद्दीन मोमीन आहेत. मोमीन यांनी ते गीत रचले. त्यांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली. मात्र, त्या गीताच्या निमित्ताने कऱ्हाडला मिळालेला स्वच्छता गीताचा रचनाकर मात्र हरपला आहे. 

रयत शिक्षण संस्थेतून मोमीन शिक्षक म्हणून निवृत्त झाले. नागठाणे येथील निनाम पाडळी त्यांचे मूळगाव होय. मात्र, कऱ्हाडला ते 2004 पासून स्थायिक झाले. मूळचे कवी मनाचे असलेल्या मोमीन यांना शहरात सर नावाने ओळखले जायचे. त्यांची अनेक पुस्तके आहेत. कविता त्यांच्या आवडीचा विषय होता. येथील शिवाजी हाउसिंग सोसायटीत ते राहत होते.

सर्वसामान्यांशी एकरूप होणाऱ्या चंद्रलेखाराजे पंचतत्त्वात विलीन

तेथील छत्रपती शिवाजी उद्यानात त्यांनी कवी कट्टा व गीत संध्या कार्यक्रम सुरू करण्याची परंपरा आखली. "गीत संध्या' व्दारे नव्या गीतकारांना संधी दिली. त्याच कट्ट्यावर त्यांना कऱ्हाडच्या स्वच्छतेचे गीत सुचले. त्यांनी ते रचले. वृक्षमित्र चंद्रकांत जाधव यांच्या सहकार्याने मोमीन यांनी उत्स्फूर्त लिहिलेले गीत तत्कालीन आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांना दाखवले. त्यांनाही ते भावले. ते त्वरित संगीतबद्ध केले. प्रसाद जोशी, सागर शिराळकर यांनी त्याला संगीत दिले. तर संगीता मोहिते, सिद्धी शिराळकर, प्रसाद जोशी व राजू मोहिते यांनी ते लयबद्ध पध्दतीने गायले. पालिकेने ते गीत कचरा गोळा करणाऱ्या 30 घंटागाड्यांवर स्पीकरवर लावल्याने ते सामान्यांपर्यंत पोचले. ओ भाऊ, ओ अक्का जरा इकडे लक्ष द्या ना.... अशा त्या गीताची दिलखेचक रचना केल्याने नागरिकांनाही ते गीत अत्यंत पसंत पडले.

शोध कोरोनाबाधितांचा : उद्यापासून सातारा जिल्ह्यात प्रत्येक घरात तपासणी माेहिम

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siraj Momin Played Important Role In Karad Swachh Abhiyan