लई भारी! गोखळीतील सहा वर्षीय 'स्वरा'चे बारा तासांत 143 किलोमीटर सायकलिंग

अशोक सस्ते
Friday, 13 November 2020

लाॅकडाउनच्या काळात तिने आपल्या व्यायामाला गती दिली आणि सात महिन्यांच्या सरावानंतर तिने 12 तासांत 143 किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचा पराक्रम केला.

आसू (जि.सातारा) : गोखळी (ता. फलटण) येथील सहा वर्षांच्या स्वरा भागवत हिने 12 तास सायकलिंग करून 143 किलोमीटर अंतर पार करण्याचा पराक्रम केला आहे. तिच्या या यशस्वी कामगिरीबद्दल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्वराचे विशेष कौतुक करून सत्कार केला.
 
एवढ्या लहान वयात स्वराने व्यायामचा जोपासलेला छंद कौतुकास्पद असून, भविष्यात निश्‍चितच ती क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास रामराजे यांनी व्यक्त केला. या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, उपसरपंच योगेश गावडे, नवनाथ गावडे, छावा ग्रुपचे योगेश जाधव, राजेंद्र भागवत, योगेश भागवत उपस्थित होते.

राजकीय मतभेदानेच कोयना, कृष्णा अस्वच्छ; कऱ्हाडात स्वच्छता मोहिमेलाच तिलांजली

बुधवारी (ता. चार) स्वराने गोखळी- बारामती- मोरगाव- जेजुरी- नीरा- लोणंद- फलटण -राजाळे- गोखळी असा पहाटे 3.45 वाजता सायकल प्रवास सुरू करून 12 तासांत 143 किलोमीटर अंतर पूर्ण केले. गोखळी येथील जय हनुमान दहीहंडी संघाचे अध्यक्ष व फलटण एसटी आगारातील वाहक योगेश भागवत यांची स्वरा ही कन्या आहे. त्यांनी स्वराला वयाच्या तिसऱ्या वर्षी पोहायला शिकवले. धावणे, दोरी उड्या आणि सायकलींचेही प्रशिक्षण देत आहेत. काका पोलिस उपनिरीक्षक रूपेश भागवत, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश भागवत, आजोबा राजेंद्र भागवत या सर्वांना व्यायामाची आवड असल्याने स्वरालाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली.

तुमच्या व्यवसाय वाढीसाठी सकाळचा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म

लाकडाउनच्या काळात तिने आपल्या व्यायामाला गती दिली आणि सात महिन्यांच्या सरावानंतर तिने 12 तासांत 143 किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचा पराक्रम केला.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Years Old Swara Bhagwat Travelled 143 Kilometers In Twelve Hours On Bicycle Satara News