Solapur : अधिकाऱ्यांनो,भजन कीर्तनाचा एवढा त्रास होत असेल तर घरी बसा :अक्षय महाराज भोसले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara news

Satara : अधिकाऱ्यांनो,भजन कीर्तनाचा एवढा त्रास होत असेल तर घरी बसा :अक्षय महाराज भोसले

दहिवडी : भजन कीर्तन मंदिरात नाही होणार तर मग होणार कुठे? अधिकाऱ्यांनो, तुम्हाला भजन कीर्तनाचा एवढा त्रास होत असेल तर घरी बसा, कशा करता मंदिरात नोकरी करता? असा खडा सवाल वारकरी संप्रदाय युवा मंचचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी केला आहे. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाराज मंडळींना भजन कीर्तन करण्यास घालण्यात आलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

अक्षय महाराज म्हणाले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र याबाबत एक वेगळे वृत्त समोर आले आहे. ते म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केलेले संतापजनक विधान. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाराज मंडळींनी भजन, कीर्तन कार्यक्रम केल्यास मुख दर्शन रांगेतील भाविकांना त्रास सहन करावा लागतो.

भजन कीर्तनास महाराज मंडळींचे अनेक शिष्यगण येत असल्याने पोलिसांना सुरक्षा करण्यास अडचण येते. तसेच सभा मंडपात मंदिर समितीचे कार्यालय असल्याने कामकाज करताना भजन कीर्तनाचा त्रास होतो. या कारणांमुळे मंदिरात भजन कीर्तन करण्यास महाराज मंडळींना बंदी घालण्यात आली असे अतिशय संतापजनक विधान पुदलवाड यांनी केले आहे.

अक्षय महाराज म्हणाले, भगवान श्री पंढरीनाथांना आपले भजन, कीर्तन करणारा भक्त प्रिय आहे. मात्र ते संबंधित अधिकारी वर्गाला समजू नये ही मोठी शोकांतिका आहे. आजपर्यंत या बाबींचा कधीच कोणाला त्रास झाला नाही मग असे अचानक काय घडले? ज्यामुळे असा निर्णय घेण्यात आला. महाराज मंडळींच्या शिष्यगणामुळे सुरक्षेस अडचण येते हे विधान तर केवळ हस्यास्पद आहे.

राजकीय मंडळी जेव्हा आपल्या सोबत कार्यकर्त्यांचे भले मोठे टोळके घेऊन येतात तेव्हा पोलिसांना सुरक्षा करताना त्रास होत नाही का? भजन कीर्तनाचा कार्यक्रम मंदिराऐवजी संत श्री तुकाराम भवन येथे करावे असे मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांचे म्हणणे आहे. एखादे भवन हे वारकरी वर्गाचे श्रद्धास्थान होऊ शकत नाही ते अलीकडच्या काळात सांस्कृतिक किंवा इतर कार्यक्रम यासाठी बांधण्यात आले आहे.

भजन कीर्तन नामजप हे मंदिरात होणे अपेक्षित आहे. शेकडो वर्षांच्या परंपरा अधिकारी वर्ग कसे काय बदलू शकतात? हे सर्व पाहता मंदिर समितीवर कशा प्रकारचे अधिकारी नेमले जावे याचे सरकारला देखील गांभीर्य असणे गरजेचे आहे. मंदिर समितीने घडलेल्या प्रकाराबद्दल माफीनामा द्यावा व आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा महाराष्ट्रभर वारकरी वर्गाकडून याचा निषेध म्हणून तीव्र पडसाद उमटतील असा इशाराही अक्षय महाराज यांनी दिला.

मंदिर समितीवर कार्यरत असणाऱ्या सर्व वारकरी प्रतिनिधी सदस्यांनी तातडीने आपले राजीनामे द्यावेत. कदाचित तुम्हाला विसर पडला असेल वारकरी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला समिती वर घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर आंदोलने केली आहेत. वारकरी प्रतिनिधी समितीवर असताना अशी व्यवस्था असेल तर इतर मंडळी कधीही बरी असेही अक्षय महाराज म्हणाले.

- अक्षय महाराज भोसले

Web Title: Solapur Officials Bhajan Kirtana Ough Question Authorities

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..