कडक सॅल्यूट! गावच्या भल्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाकडून लाखाचे बक्षीस जाहीर

रुपेश कदम
Tuesday, 22 December 2020

सतीश कोकरे सैन्यात असले तरी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावात होणारे वादविवाद, वेळेची, पैशाची हानी त्यांनी पाहिली आहे. निवडणुकीमुळे अनेकदा गावात मोठ्या प्रमाणात वैरभाव निर्माण होतो, तसेच संघर्षामुळे गावाचा विकासही खुंटतो. हे सर्व टाळून गावाला विकासाच्या रस्त्यावर न्यायचे असेल, तर गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणे हा उत्तम मार्ग असल्याचे कोकरे यांनी सांगितले.

दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्यातील मौजे सुरुपखानवाडी गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, अशी आर्त हाक जम्मू-काश्मीर येथे सीमेवर तैनात असलेले हवालदार मेजर टेक्निशियन सतीश बंडू कोकरे यांनी आपल्या गावातील गावकऱ्यांना दिली आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास गावच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

सतीश कोकरे यांना सैनिकी वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. त्यांचे वडील सैन्यातून जवानांना दिलेल्या 'कॅप्टन' या सर्वोच्च पदावरुन वीस वर्षापूर्वी सेवानिवृत झाले आहेत. ते सध्या आजी-माजी सैनिक पेन्शनर्स संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे माण तालुकाध्यक्ष आहेत. २०१० ते २०१५ या कालावधीमध्ये ते सुरूपखानवाडी गावाचे उपसरपंच होते. त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक विकासकामांना चालना दिली, तसेच स्वतः वैयक्तिक खर्चातूनही कामे केली.

फायद्याची गोष्ट! ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् दोन लाखांचे बक्षीस मिळवा

सतीश कोकरे सैन्यात असले तरी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावात होणारे वादविवाद, वेळेची, पैशाची हानी त्यांनी पाहिली आहे. निवडणुकीमुळे अनेकदा गावात मोठ्या प्रमाणात वैरभाव निर्माण होतो, तसेच संघर्षामुळे गावाचा विकासही खुंटतो. हे सर्व टाळून गावाला विकासाच्या रस्त्यावर न्यायचे असेल, तर गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणे हा उत्तम मार्ग आहे हे त्यांनी जाणले. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रस्ताव त्यांनी गावकऱ्यांसमोर मांडला आहे. हा प्रस्ताव मान्य केला, तर त्यांनी गावाला एक लाख रुपयाचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. आता एका सैनिकाच्या या प्रस्तावाला गावकरी किती प्रतिसाद देणार हे पहावे लागणार आहे. गावकरी व गावातील गाव गाडा चालवणारे पुढारी यांच्यावरच बिनविरोध निवडणूक अवलंबून आहे.

पब्लीक सब जानती है; पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम : शशिकांत शिंदे

आमच्या गावाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. तसे झाल्यास मी स्वतः एक लाख रुपये देणार आहे. माझ्यासारख्या सैनिकांना गावाचा विकास होताना पहाणे यासारखा आनंद नाही. 

-सतीश कोकरे, हवालदार मेजर टेक्निशियन

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldier Satish Kokare Declared One Lakh Prize For Unanimous Grampanchayat Election Surupkhanwadi