खोटे बोलण्याने मावस जावई जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Son in law arrested for murdering mother in law and father in law

खोटे बोलण्याने मावस जावई जाळ्यात

कऱ्हाड - विसापुरातील (ता. खटाव) ज्येष्ठ दांपत्याचा खून झाला होता. खून कोणी केला, कधी झाला, त्याची काहीच तांत्रिक माहिती पोलिसांच्या हाती नव्हती. पुरावा नसताना केवळ खबऱ्याने दिलेली माहिती आणि तांत्रिक तपासामुळे शेवटच्या टोकापर्यंत पोलिसांना पोचता आले. स्वतःचा कर्जबाजारीपणा संपण्यासाठी सासू- सासऱ्यांची जीवनयात्रा संपवणारा जावयाला १५ दिवसांत पोलिसांनी साथीदारासह गजाआड केला. तांत्रिक तपासातील तत्परता अन् खबऱ्यांची माहिती तंतोतंत जुळल्याने जावयाचा खोटेपणा उघड झाला अन् तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

विसापुरातील वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ दांपत्याचा खून झाल्याच्या घटनेने पोलिसांची झोप उडाली होती. दोघांचा अत्यंत निर्घृणपणे मध्यरात्रीनंतर खून झाल्याने खटाव तालुकाही हादरला होता. घटना उघडकीस येण्यापूर्वी किमान २४ तास आधी त्यांचा खून झाल्याचा अंदाज होता. ज्येष्ठ दांपत्याचा दिनक्रम ठरलेला होता. तो शेजाऱ्यांनाही माहिती होता. खून झाला त्या दिवशी दिवसभर पाऊस होता. त्यामुळे सारेच घरात होते. दांपत्याकडे पावसामुळे कुणाचे फारसे लक्ष गेले नाही. दिवसभरात दोघेही दिसले नाहीत, म्हणून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना हाक मारली. पलीकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्या महिलेने खोलीजवळ जाऊन पाहिले. त्यावेळी त्यांच्या खोल्यांना बाहेरून कडी घातली होती.

खोलीतील लाइटही बंद होती. त्यांनी त्वरित त्या आजींच्या मोबाईलवर फोन लावला. तोही त्यांनी उचलला नाही. त्या महिलेने त्या दांपत्याच्या सुनेला ती माहिती दिली. सुनेने फोन लावला, त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. दोघींच्या मनात शंका आली. सुनेने शेजारील महिलेला ‘तुम्ही घरी जाऊन बघा’ असे सांगितले. शेजाऱ्यांनी त्या घराच्या दोन्ही खोल्यांच्या कड्या उघडल्या. आतील दृश्य पाहून सारेच हादरले. ज्येष्ठ दांपत्य निपचित पडले होते. दोघांच्याही नाका-तोंडातून रक्त आले होते. तेही सुकलेले होते. आजींच्या गळ्यातील दागिने लंपास होते. शेजाऱ्यांनी त्वरित पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी काहीही पुरावा नव्हता. तेथे हत्यार पडलेले नव्हते. ठसे मिळाले नाहीत. मृत महिलेच्या अंगावरील दागिने फक्त गायब झाले होते. त्याचवेळी घरातील अन्य कोणत्याही मौल्यवान वस्तूंना हात लावला नव्हता. गुन्हेगार चतूर होता, मात्र तो ओळखीतला असावा, असा पोलिसांचा अंदाज होता.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे व फौजदार अमित पाटील यांच्यासह हवालदार मंगेश महाडिक, अमोल माने, अजित कर्णे, शिवाजी भिसे यांचे पथक तपासाला स्थापन केले. पथकाने सुरुवातीला दांपत्याच्या नातेवाइकांकडे तपास सुरू केला. ‘स्थागुशा’च्या तपासात पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे व कर्मचाऱ्यांनी माहिती देऊन मोलाचे योगदान दिले. त्यात मावस जावयाचे त्या दांपत्याच्या घरी येणे-जाणे होते, त्याची माहिती हाती आली.

नातेवाइकांची मोबाईलही पोलिसांच्या तपासावर होते. त्या तांत्रिक मुद्द्यांचे विश्लेषण करताना मावस जावई पोलिसांच्या रडारवर आला. त्याने पहिल्या जबाबात पाच जुलैला दांपत्याच्या घरी गेल्याची कबुली दिली. त्यानंतर गेलो नसल्याचा सांगत खोटे बोलला. तेच जावयाच्या अंगलट आले. घटनेच्या रात्री जावई त्या घरात मित्रासह जेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला खबऱ्यांनीही दुजोरा दिला. त्याला दुसऱ्यांदा तपासाला ताब्यात घेतले. त्यावेळी तो पोलिसांना थेट शरण आला. स्वतःचा कर्जबाजारीपणा घालवण्यासाठी मावस सासू- सासऱ्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याच्या कटाचे बिंग पोलिसांनी फोडले. त्याने आखलेल्या कटाला कऱ्हाडातील संशयितानेही आकार दिला होता. त्यामुळे दुहेरी खुनाचे धाडस केले. पहिल्यांदा सासूला उशी तोंडावर ठेवून मारली. आतील खोलीत सासऱ्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांच्याशी त्यांची झटापट झाली.

गुन्ह्याच्या तापासाकडे पोलिस सरकत होते. तो गुन्हा आता उघडकीस येणार अन् आपण सापडणार, याची खात्री झाल्यानंतर मावस जावई आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत होता. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. खुनात जावयाचा सहभाग असल्याची खात्री होती. तो ज्या खासगी महाविद्यालयात नोकरीला होता. तेथून त्याला उचलला. पार्ले त्याचे आजोळ आहे, त्यामुळे तेथील लहानपणीचा मित्रही त्याच्या कटात होता. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

तपासातील शिलेदार...

पोलिस अधीक्षक अजय बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, फौजदार अमित पाटील, हवालदार मंगेश महाडिक, साबीर मुल्ला, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, संतोष सपकाळ, अमोल माने, अजित कर्णे, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, प्रवीण कांबळे, स्वप्नील माने, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रोहित निकम, वैभव सावंत, सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. एस. शेळके, यशवंत घाडगे, सुशांत कदम.