एसपी तेजस्वी सातपुतेंकडून पोलिस निरीक्षकांची पाठराखण? सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार

गिरीश चव्हाण
Sunday, 3 January 2021

या चौकशीत काय समोर येणार याकडे पोलिस दलाचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा : स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांची पाठराखण केल्याचा आरोप करत राजेंद्र चोरगे यांनी राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे तत्कालीन अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरील सुनावणीसाठी ता. 14 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश राजेंद्र चोरगे यांना प्राधिकरणाने दिले आहेत.
 
साताऱ्यातील एका शाळेच्या अनुषंगाने राजेंद्र चोरगे आणि इतरांत न्यायालयीन वाद सुरू आहेत. या वादादरम्यान शाळेचा ताबा घेण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला होता. या अनुषंगाने काही तक्रारी सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तक्रारीच्या चौकशीदरम्यान डांबून ठेवत लाखो रुपये लाच रूपात स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट आणि दप्तरी विजय शिर्के यांनी स्वीकारल्याची तक्रार राजेंद्र चोरगे यांनी केली होती. चौकशीत दोषी आढळल्याने शिर्के याचे निलंबन करण्यात आले होते. या प्रकरणात घनवट यांचाही सहभाग असून, त्यांना पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप चोरगे यांनी त्या वेळी केला होता. त्यानुसार त्या वेळचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी केली. चौकशी अहवाल प्रलंबित असतानाच देशमुख यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी तेजस्वी सातपुते यांची नियुक्‍ती झाली. नियुक्‍तीनंतर सातपुते यांनी चोरगे यांच्या तक्रारीवरील चौकशी अहवाल न स्वीकारता पुन्हा फेरचौकशी नेमली.

प्रतिक्षा संपली! पंधरा दिवसांत सातारकरांना मिळणार कोरोनाची लस 

फास्टॅगच्या बंधनावर तासवडे, आनेवाडीत उसळणार विराेधाची लाट? 
 
पोलिस निरीक्षक घनवट यांची पाठराखण केल्याचा आरोप करत चोरगे यांनी तेजस्वी सातपुते यांच्याविरोधात राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत चोरगे यांच्या तक्रार अर्जावरील चौकशी ता.14 जानेवारी सकाळी 11 वाजता निवृत्त न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांच्या खंड न्यायपीठापुढे होणार आहे. या चौकशीसाठी हजर राहण्याचे सूचनापत्र राजेंद्र चोरगे यांना प्राधिकरणाच्या वतीने मुख्य प्रशासकीय अधिकारी नितीन गायकवाड यांनी दिले आहे. या चौकशीत काय समोर येणार याकडे पोलिस दलाचे लक्ष लागून राहिले आहे. 

नाद खूळा! वेश बदलून एसपीच फिरताहेत साता-याच्या रस्त्यांवर 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SPCA Will Enquire Superintendent Of Police Tejaswi Satpute Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: