सातारा : कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम

प्रवीण जाधव
Tuesday, 1 December 2020

कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत सर्वेक्षण करणारी टीम जिल्ह्यातील सुमारे 27 लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचणार आहे. त्यामुळे या टीमच्या माध्यमातून कोरोनाबाबतचे सर्वेक्षणही केले जाणार असल्याचे डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले. त्यामुळे कोरोना रुग्णही लवकरच निष्पन्न होऊन मृत्यूदर रोखण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

सातारा : जिल्ह्यातून कुष्ठरोग व क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आजपासून (मंगळवार) 16 डिसेंबर पर्यंत संपूर्ण जिल्हाभर होम टू होम सर्वेक्षणाची मोहीम राबविणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, कुष्ठरोग निर्मूलनाचे सहायक संचालक डॉ. राजेश गायकवाड व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांनी दिली.
 
डॉ. राजेश गायकवाड म्हणाले, ""कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील कुष्ठरोग निर्मूलनाच्या मोहिमेकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. याबाबत तातडीने मोहीम राबविण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून मिळाल्या होत्या. कुष्ठरोग व क्षयरोगाचे रुग्ण तपासण्यासाठी जिल्ह्यात पाच हजार 46 कर्मचाऱ्यांची दोन हजार 523 पथके तयार केली आहे. त्यामध्ये अशा स्वयंसेविका व त्यांच्या मदतनीसांचा समावेश आहे. या पथकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 511 सुपरव्हायझरही नेमलेत. गेल्या वर्षी जिल्ह्यात कुष्ठरोगाचे 202 रुग्ण सापडले आहेत. त्यातून जिल्ह्यातून कुष्ठरोगाचे निर्मूलन झाले असे म्हणता येणार नाही. तत्काळ निदान झाल्यास कुष्ठरोग हा सहा तो 12 महिन्यांत पूर्णत: बरा होतो. त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकाला सहकार्य करून त्वचारोगांबाबत माहिती द्या.''
 
क्षयरोगाचे निदान व उपचाराची पूर्ण सुविधा शासनाकडून मोफत होते. हा रोग पूर्णत: बरा होणार आहे. त्याचबरोबर सकस आहारासाठी रुग्णाला दरमहा 500 रुपयेही शासनाकडून देण्यात येतात. योग्य उपचार मिळाले नाहीत, तर क्षयरोगामुळे होण्याचे मृत्यूचे प्रमाण हे 45 टक्के आहे. त्यामुळे नागरिकांनी खोकला येत असल्यास सर्वेक्षणाला येणाऱ्या पथकाला माहिती देऊन तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. 

क-हाडकरांनी कसली कंबर, काेल्हापूरकर जाेमात, पुण्यात सर्वाधिक कमी मतदान

कोरोना रुग्णांचेही होणार सर्वेक्षण
 
कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत सर्वेक्षण करणारी टीम जिल्ह्यातील सुमारे 27 लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचणार आहे. त्यामुळे या टीमच्या माध्यमातून कोरोनाबाबतचे सर्वेक्षणही केले जाणार असल्याचे डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले. त्यामुळे कोरोना रुग्णही लवकरच निष्पन्न होऊन मृत्यूदर रोखण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Campaign For Eradication Of Leprosy And Tuberculosis Satara News