
सातारा : दुर्गम गावांसाठी स्पीड बोट ॲम्ब्युलन्स
कऱ्हाड - कोयना धरण परिसरातील गावांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अद्ययावत सुविधांनीयुक्त स्पीड बोट ॲम्ब्युलन्स व अन्य आरोग्यविषयक सोयी- सुविधांसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मान्यता दिली आहे. त्यासाठी सुमारे एक कोटीच्या निधीलाही त्यांनी मंजुरी दिली आहे. अनेक दिवसांपासूनच्या प्रलंबित मागणीला खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मागणीनुसार अखेर यश आल्याने जलाशयातील दोन्ही बाजूच्या तीरावर वसलेल्या जवळपास ६० गावांना मदत होणार आहे.
कोयना धरणात जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर अशा तीन तालुक्यांतील गावांचा समावेश होतो. तेथील नागरिकांच्या आरोग्याची उत्तम सोय व्हावी, दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्याच्या समस्या सुटाव्यात, यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. त्यानुसार त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांच्याकडे पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटीद्वारे पाठपुरावा केला होता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात स्पीड बोट ॲम्ब्युलन्स खरेदीसह आरोग्यविषयक सोयी- सुविधांसाठी मान्यता दिली आहे. त्यासाठी सुमारे एक कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्या निधीचा उपयोग स्पीड बोट ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय उपकरणे व औषधे खरेदीला होणार आहे. देखभाल दुरुस्ती व लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची तरतूददेखील केली आहे. त्याची माहिती मंत्री डॉ. पवार यांनी खासदार पाटील यांना पत्राद्वारे कळवली आहे. अत्याधुनिक आरोग्य यंत्रणेसह स्पीड बोटीमुळे जलाशयातील दोन्ही बाजूच्या तीरावर वसलेल्या जवळपास ६० गावांना मदत होणार आहे. त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांसह तातडीच्या गरजेच्या वेळीही स्पीड बोटचा वापर करून त्यांना आरोग्याच्या उत्तम सुविधा देता येणार आहेत.
Web Title: Speed Boat Ambulance For Remote Villages Near Koyna Dam
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..