अहाे, ऐकलत का! स्वस्तात घर खरेदी झाली शक्य

प्रवीण जाधव
Thursday, 24 December 2020

दस्त नोंदणीसाठी होत असलेल्या गर्दीचा विचार करून सातारा व कऱ्हाड येथील दोन्ही दस्तनोंदणी कार्यालये 31 डिसेंबरपर्यंत सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक बी. के. खांडेकर यांनी दिले आहेत.

सातारा : कोरोना संसर्गात मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) शासनाने केलेल्या कपातीचा जिल्ह्यातील नागरिकांनी फायदा घेतल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दस्तनोंदणी वाढली आहे. त्यामुळे मरगळ आलेल्या जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला बुस्टर डोस मिळाला आहे. शासनाची ही सवलत मार्चपर्यंत काय राहणार असल्याने नागरिकांची स्वत:त घर खरेदी होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून बांधकाम क्षेत्रावर मंदीचे सावटा आहे. नोटा बंदीनंतर या क्षेत्राचे पुरते कंबरडे मोडले होते. त्यातून सावरत असलेल्या या उद्योगाला कोरोना संसर्गाचाही अन्य उद्योगांप्रमाणे मोठा झटका बसला. त्यामुळे या क्षेत्राला चालना मिळण्यासाठी शासनाने मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरी भागात एक टक्का सेस आणि दोन टक्के मुद्रांक शुल्क असे मिळून तीन टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागणार होते, तर ग्रामीण भागात चार टक्‍क्‍यांऐवजी एक टक्का मुद्रांक शुल्क आणि एक टक्का जिल्हा परिषद कर असे दोन टक्के शुल्क आकारले जाणार होते. मुद्रांक शुल्कातील वाढीमुळे खरेदीदस्तासाठी नागरिकांना जास्त रक्कम मोजावी लागत होती. फ्लॅटच्या खरेदीत ही रक्कम काही लाखांत जात होती. त्यामुळे मुद्रांक शुल्कात कपात करण्याची मागणी विकसक आणि क्रेडाईची अनेक दिवसांपासून होती. शासनाच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे घरांच्या खरेदीसाठी हा निर्णय प्रोत्साहन देणारा ठरला आहे.
 
मुद्रांक शुल्कातील कपातीचा जास्त लाभ फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांनी घेतला. त्यामुळे अनेक विकसकांच्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पातील सदनिकाही विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मरगळलेल्या जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायाला चालना मिळण्यास मदत मिळाली आहे. शासनाने मुद्रांक शुल्कातील सवलत मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ पूर्वीच्या तुलनेत ग्राहकाला अर्धा टक्के मुद्रांक शुल्क जास्त भरावे लागणार आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्च या कालावधीत ग्रामीण भागात दोनऐवजी अडीच टक्के मुद्रांक शुल्क, तर पालिका क्षेत्रात तीनऐवजी साडेतीन टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. त्यातूनही ग्राहकांचे हजारो रुपये वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सदनिका खरेदीचा वाढलेला वेग मार्चपर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत.

उदयनराजेंनी केले पंतप्रधान नरेंद्र माेदींचे अभिनंदन

कोरोना संसर्गामुळे अनेकांची आर्थिक कोंडी झाली; परंतु मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे सप्टेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील दस्तनोंदीचा आलेख पाहिल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढत गेल्याचे स्पष्ट होत आहे. सप्टेंबर महिन्यात गेल्या वर्षी तीन हजार 961 दस्तांची नोंदणी झाली, तीच संख्या चालू वर्षात चार हजार 300 झाली आहे. ऑक्‍टोबरमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत एक हजार 809 ने वाढ होऊन पाच हजार 262 दस्तांची नोंद झाली. नोव्हेंबरमध्येही पाच हजार 920 दस्तांची नोंद झाली. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या एक हजार 163 ने जास्त आहे. 31 डिसेंबरपर्यंत सवलतीची मुदत होती. त्यामुळे या महिन्यातही दस्त नोंदणी वाढली आहे. जिल्ह्यातील सर्वच दस्त नोंदणी कार्यालयांत नागरिकांची गर्दी आहे. 

कुत्र्यांच्या भुंकण्याने पाटील कुटुंबिय जागे झाले, पाहतात तर काय ? बिबट्या दारात
 

 

मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याचा शासनाचा निर्णय बांधकाम क्षेत्रासाठी जीवनादायी ठरलेला आहे. गेल्या वर्षात झाले नाहीत एवढे व्यवहार सवलत दिल्यापासून झाले आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच त्याचा फायदा होत आहे. संपूर्ण क्षेत्रात एक 
नवे चैतन्य निर्माण झाले आहे. शासनाने ही सवलत अशीच सुरू ठेवावी.

- विवेक निकम, सचिव, क्रेडाई 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stamp Duty Decreased For Purchasing Home Satara News