शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर राजू शेट्टींचा एल्गार; सोमवारी साताऱ्यात 'स्वाभिमानी'चा मोर्चा

गिरीश चव्हाण
Thursday, 19 November 2020

पायी मोर्चाचा पहिला मुक्काम काशीळ येथे असणार असून दि. 24 रोजी सकाळी मोर्चा पुन्हा कराडकडे मार्गस्थ होईल. दि. 24 रोजी खोडशी येथे मोर्चा रात्रीचा मुक्काम करणार असून यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले आहे.

सातारा : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेत्तृत्वाखाली दि. 23 ते 25 या कालावधीत सातारा ते कराड असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची समाप्ती दि. 25 रोजी कराड येथे होणार असून त्याबाबतचे निवेदन नुकतेच संघटनेच्या वतीने राजू शेळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले. 

यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ, देवानंद पाटील, जनार्दन आवारे, संजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने वारंवार केंद्र आणि राज्य सरकारला निवेदने देण्यात आली आहेत. निवेदने देवूनही शासन शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी दि. 23 ते 25 या कालावधीत हा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात दि. 23 रोजी सकाळी नउ वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेत्तृत्वाखाली सातारा येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन होणार आहे. 

महाबळेश्वर, पांचगणीतील गर्दी सर्वांना अडचणीत आणू शकते; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

यावेळी मागण्यांचे निवेदन ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना देण्यात येणार आहे. पायी मोर्चाचा पहिला मुक्काम काशीळ येथे असणार असून दि. 24 रोजी सकाळी मोर्चा पुन्हा कराडकडे मार्गस्थ होईल. दि. 24 रोजी खोडशी येथे मोर्चा रात्रीचा मुक्काम करणार असून यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे. याठिकाणाहून सकाळी मोर्चा कराडकडे मार्गस्थ होईल. दि. 25 रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तसेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे. निवेदन दिल्यानंतर थोड्यावेळासाठी ना. पाटील यांच्या घरासमोर इशारा आंदोलन करण्यात येणार आहे. इशारा आंदोलन संपवून मोर्चा कराड येथील प्रितीसंगम येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दाखल होणार आहे. समाधीला अभिवादन, चिंतन सत्याग्रह करुन येथे मोर्चाची समाप्ती करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement Given By Swabhimani Shetkari Sanghatana To The Collectors Office Satara News