
कऱ्हाड : वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह कऱ्हाड शहरासह तालुक्याच्या विविध भागांना परिसरात आज सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी पाऊस झाला. गारांचा खच रस्त्यावर पडला. जोराचा वादळी पाऊस आणि गारामुळे आंबा, कलिंगड, टरबूज, द्राक्षांसह पालेभाज्यांचे नुकसान झाले. पुणे- बंगळूर महामार्गावरील कोल्हापूर नाका परिसर आणि शहरातील विजय दिवस चौकातील रस्त्यावर झाड पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. पंचायत समितीसमोरील इमारतीवर जुने झाड पडून नुकसान झाले. शहरासह परिसरातही अनेक ठिकाणी झाडे पडल्याने नुकसान झाले. वीजपुरवठाही खंडित झाला होता.