दुष्काळाने हाेरपळलेले चंद्रहारांनी दहा हजारांत संत्र्याचे मिळविले पाच लाख

दुष्काळाने हाेरपळलेले चंद्रहारांनी दहा हजारांत संत्र्याचे मिळविले पाच लाख

बिजवडी (जि. सातारा) : बोराटवाडी (ता. माण) येथील चंद्रहार गोरे यांनी सेंद्रिय पध्दतीने झिरो बजेट शेती करत संत्रा-मोसंबी या फळबागेची लागवड केली असून, संत्र्याच्या 225 झाडांतून केवळ दहा हजार रुपये खर्चात ते वर्षातून पाच लाख रुपयांवर उत्पन्न काढत आहेत. त्यांच्या या झिरो बजेट सेंद्रिय बागेची जोरदार चर्चा असून, ती पाहण्यासाठी व संत्र्यांची चव चाखण्यासाठी नागरिक व खवय्ये गर्दी करत आहेत. 

बोराटवाडी येथे श्री. गोरे यांची सन 2017 पूर्वी डाळिंबाची फळबाग होती. परंतु, दुष्काळ, पाणीटंचाई, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने फळबाग कायम तोट्यात होती. परिणामी आर्थिक गणित कोसळले. याला पर्याय म्हणून त्यांनी झिरो बजेट शेतीकडे वळण्याचे ठरवले. डाळिंब फळबाग काढून त्यांनी सप्टेंबर 2017 मध्ये रंगपूर व्हरायटीची 225 संत्र्याची झाडे 16 बाय 12 या अंतरावर लावली.

लागवडीचा खर्च सोडला तर नंतर त्यांनी अगदी थोडा खर्च करत दुष्काळी परिस्थितीवर मात करत रोपे जगवली. उपलब्ध पाण्याचा योग्य वापरासाठी त्यांनी ठिबकच्या प्रत्येक ड्रिपरखाली एक टप, कारखान्यामधून बाहेर टाकली जाणारी राख आणून टाकली. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा ओलावा टिकवून राहण्यास मदत झाली. लागवड केल्यानंतर सुमारे दीड वर्षात त्यांना फळे धरता आली. सेंद्रिय पध्दतीने झिरो बजेट शेती करताना त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवाणू वाढीसाठी लागणारे विविध साहित्य जमा करून एक कल्चर तयार करून स्लरी बनवली. स्लरीचा खर्चही अगदी किरकोळ असल्याने झिरो बजेट शेती करता आली. याच स्लरीवर त्यांनी बागेची जोपासना केली असून, ही स्लरी ते फळबागेला प्रत्येक पाच दिवसांतून ड्रिपद्वारे व 15 दिवसांतून फवारणीतून देत आहेत.

आनंदरावांच्या कष्टाचे झाले चीज; शेणोलीत 26 गुंठ्यांत 72 टन उसाचे उत्पादन
 
ड्रिपद्वारे सोडल्यामुळे गांडूळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, आजही त्यांच्या फळबागेत गेले तर जमीन भुसभुशीत व छिद्रमय दिसून येते. फवारणीमुळे कीड, रोगराई येत नाही. डाळिंबाप्रमाणेच संत्र्याच्या फळांचा कालावधी सहा महिने असतो. मात्र, याचा बहर कायमच चालतो. कळ्या लागत असून, त्या आपोआप सेटिंग होत असल्याने कायमस्वरूपी पैसे देणारे हे फळपीक आहे. तीन टप्प्यात फळे तयार होत असल्याने पहिली फळे तोडली तर त्या मागे दुसरे फळ तयार असते तर काही फळे कळी अवस्थेत असतात. एकावेळी सर्व फळे उतरायची म्हटले तर दोन महिने बाग ताणावर सोडावी लागते. मग एकदम सेटिंग होऊन फळे एकावेळी उतरता येतात. फळबागेची सर्व कामे ते स्वत: तसेच पत्नी नीता, मुली प्रांजली, धनश्री व मुलगा स्वप्नील हेच पाहत असतात. 

ग्राहक थेट शेतावर 

संत्र्याच्या मार्केटसाठी श्री. गोरे यांना कुठे जावे लागत नाही. सेंद्रिय संत्रा असल्यामुळे ग्राहक थेट शेतावर येऊन अगोदर चव चाखून 100 रुपये किलोपर्यंत संत्रा स्वत: तोडून नेतात. संत्र्यासाठी मुंबई, पुण्यासारखे मोठे मार्केट आहे. व्यापारी व छोटे व्यावसायिकही संत्रा जाग्यावर येऊन घेऊन जातात. 

आपल्या भागातही संत्रा हे फळपीक येऊ शकते. डाळिंब, सीताफळप्रमाणे संत्र्याची माणवासीयांनी लागवड करणे गरजेचे आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे हे फळपीक आहे. प्रशासनाने मला परवानगी दिली तर मी शासकीय नर्सरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी दरात संत्र्यांची रोपे पुरवू शकतो. झिरो बजेट शेतीसाठी मी स्लरीचे एक कल्चर तयार केले आहे. त्याच्या सर्व टेस्ट, रिपोर्ट घेऊन पेटंट तयार करायचे आणि ते माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायचे आहे असे चंद्रहार गाेरे यांनी नमूद केेले.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com