सातारा : शेडपासून पाच कंपन्यांपर्यंतचा यशस्वी प्रवास

खेडच्या राजेंद्र कदमांची धडपड; आयएसओ मानांकनासह ४० टक्‍क्यांपर्यंत एक्स्‍पोर्टही
success stories
success storiessakal

सातारा : प्रतिकूल परिस्थितीत यशाला गवसणी घालणे तेवढे सोपे नसते. परिस्थितीची आव्हाने स्वीकारायची असतात. अचूक निर्णय क्षमता, माणसांची पारख, काळाचा वेध घेणारी दृष्टी असेल तरच यशाला गवसणी घालता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण राजेंद्र कदम. दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा आपला उद्योग उभारला, तर आपणही इतरांना काम देऊ शकू, अशा विचारातूनच रचलेला एका उद्योगाचा पायाचा कळस आज पाच उद्योगांपर्यंत गेला आहे. आपल्या कंपन्यांना आयएसओ मानांकन मिळूवन देत त्यांनी ४० टक्‍क्यांपर्यंत एक्स्‍पोर्ट वाढविण्याचे ध्येय साधले आहे.

शून्यातून प्रारंभ करून एक कंपनी उभारली अन् जिद्दीला कष्टाची जोड देत पाच कंपन्यांचे विश्‍व निर्माण करणाऱ्या राजेंद्र कदम यांचा जन्म खेड नांदगिरी (ता. कोरेगाव) येथील. वडील कुमार कदम विद्युत मंडळात वायरमन होते. राजेंद्र यांचे खेड येथे प्राथमिक शिक्षण, तर लिंबमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत. महाविद्यालयीन शिक्षणावेळी त्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम केले. परंतु, इतरांना नोकरी देणारे व्हायचे, हे त्यांचे स्वप्न त्यांना खुणावत होते. त्यातूनच त्यांनी खेडमध्ये एका शेडमध्ये प्रथम काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. त्यासाठी भाडेतत्त्वावर मशिन आणले.

कष्टाने ते या व्यवसायात यशस्वी झाले. गावी एकत्र कुटुंब पद्धती होती. आई इंदुमती, वडील कुमार व मामा बाबासाहेब जाधव यांचे त्‍यांना नेहमीच प्रोत्‍साहन व सहकार्य लाभले. सुरुवातीच्‍या काळात बंधू संजय व राजेंद्र यांनी एकत्रित व्‍यवसायाला सुरुवात केली. व्‍यवसाय वाढीसाठी संजय यांच्या बरोबरीनेच लहान बंधू समीर व दीपक यांनीही खूप कष्ट घेतले. बहीण सुप्रिया साळुंखे यांच्या ज्ञानाच्‍या जोरावर त्यांनी व्‍यवसायाचे यांत्रिकीकरण केले. चुलती, मावशी शारदा कदम यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. पत्‍नी प्रिया या सर्व कौटुंबिक जबाबदारी अत्‍यंत कुशलतेने पार पाडत असल्‍याने राजेंद्र यांना व्‍यवसायामध्ये जास्‍तीत जास्‍त लक्ष देता आले.

व्यवसाय म्हटले, की अनेक अडचणी ठरलेल्याच असतात; पण न डगमगता ते पुढे जात राहिले. साताऱ्यात त्यांनी ओम साई कॅश्‍यू या नावाने काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. याचदरम्यान काजू प्रक्रियेसाठी लागणारे मशिनच आपण तयार केले तर, हा विचार त्यांनी प्रत्यक्षात उतरविला. कारखान्यात त्यांनी कुशल कामगार, अभियंते आणले. त्यांना आणखी प्रशिक्षण दिले. त्‍याचबरोबर लिंबमधील वसंत बरकडे यांनी डेल्‍टा मशिन कंपनीचा विस्‍तार वाढविण्यास आणि सांगलीचे स्‍वप्‍नील चव्‍हाण यांनी एशियन कॉम्‍प्रेसरचे व्‍यावसायिक जाळे वाढविण्यात मोलाचे योगदान व साथ दिल्‍याचे श्री. कदम आवर्जून सांगतात. त्यांच्या कोरेगाव येथील एशियन एअर कॉम्प्रेसर या कंपनीतून कोरोना काळात ९५० कॉम्प्रेसर त्यांनी विविध हॉस्पिटलला पुरविले.

कदम यांच्या आज ओम साई कॅश्‍यू इंडस्ट्रीज, डेल्टा कॅश्‍यू मशिन, एशियन एअर कॉम्प्रेसर, सुप्रिया फूड्स, साईटेक लेझर अशा पाच कंपन्या यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यांच्या ग्रुपमध्ये २५० पेक्षा जास्‍त कर्मचारी कार्यरत आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी कन्याकुमारीपासून काश्‍मीरपर्यंत तसेच चीन, नॉर्वे, रशियातही प्रवास केला आहे. त्यांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या मशिन्स देशातच नव्हे तर इंडोनेशिया, जपान, बांगलादेश येथेही निर्यात होतात. सध्या त्यांनी आपली निर्यात ४० टक्‍क्यांपेक्षा जास्त नेली आहे. कंपनीला आयएसओ मानांकनही मिळाले आहे.

सामाजिक बांधिलकीत कायम अग्रेसर

यशस्वी उद्योग करतानाच ते सतत सामाजिक बांधिलकी जपत असतात. प्रत्येक महिन्याला ते एहसास या मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मदत करतात. गरजू, गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करतात. धार्मिक, सामाजिक कार्यात आघाडीवर राहतात. असे हे ग्रामीण भागातून आलेले व्यक्तिमत्त्व इतर युवकांसाठी नक्कीच आर्दशवत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com