कायद्याला न जुमानणारे निसर्गापुढे शरण!, तीव्र उन्हामुळे रस्त्यावर शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

कोरोनाची संचारबंदी असली तरी नागरिक या ना त्या कारणाने दिवसभरात रस्त्यावर फिरताना आढळतात. मात्र, उन्हाळा कडकपणे सुरू झाल्यापासून दुपारी 11 नंतर रस्त्यावरही शुकशुकाट होत आहे. अगदी सायंकाळी पाचपर्यंत रस्त्यावर निदान ग्रामीण भागात तरी शुकशुकाट आढळत आहे. 

सातारा ः वाढत्या उन्हाळ्याने सकाळी दहापासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, ग्रामीण भागात दुपारपासून सायंकाळी पाचपर्यंत रस्त्यावरच काय शिवारातही चिटपाखरू दिसत नाही. दिवसातील काही काळ तरी निसर्गच माणसांना घरात बसायला लावू लागला आहे. संचारबंदी, जमावबंदी असूनही रस्त्यावरील गर्दी कमी होत नाही. मात्र, आता कायद्याला न जुमानणारी माणसे निसर्गापुढे झुकू लागली आहेत. 

गेल्या आठ दिवसांत उन्हाचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. सातारा जिल्ह्यात कालपासून 40 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत पारा जाऊ लागला आहे. सकाळी नऊ वाजले की उन्हाची तीव्रता जाणवू लागते. तर 11 पासून घराच्या बाहेर पडणेही मुश्‍कील होत आहे. नागरिकही कडक उन्हात जाणे टाळत आहेत. कामाव्यतिरिक्त बाहेर कोणी पडत नाही. सध्या शिवारात पावसाळा तोंडावर आल्याने पेरणीपूर्व मशागतची कामे करण्यात शेतकरी गुंतले आहेत. मात्र, या कामांना सकाळी सातलाच ते प्रारंभ करत आहेत. बांध-बंदिस्ती, शेतातील चगळ-चोथा, सड वेचणी करत आहेत. याबरोबरच शेणखत ओढण्याचे कामही पहाटेपासूनच केले जात आहे. गेल्या 15 दिवसांत दोन ते तीन मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्याने नांगरटीनंतर शेतातील ढेकळे बऱ्यापैकी फुटली आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात कुळवणीच्या पाळ्या देण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, ही कामे दुपारी उन्हाच्या आत केली जात आहेत. 11 पासून उन्ह कडक लागत असल्याने सकाळी सहा ते दुपारी 11 पर्यंत अन्‌ पुन्हा दुपारी चारपासून अगदी सायंकाळी सहा पर्यंतही शिवारात कुळव सुरू असल्याचे आढळते. 
कोरोनाची संचारबंदी असली तरी नागरिक या ना त्या कारणाने दिवसभरात रस्त्यावर फिरताना आढळतात. मात्र, उन्हाळा कडकपणे सुरू झाल्यापासून दुपारी 11 नंतर रस्त्यावरही शुकशुकाट होत आहे. अगदी सायंकाळी पाचपर्यंत रस्त्यावर निदान ग्रामीण भागात तरी शुकशुकाट आढळत आहे. 

रात्री उकाड्याचा सामना 

दरम्यान, गेल्या आठ दिवसांत मॉन्सूनपूर्व पाऊस झालेला नाही. अधूनमधून ढगाळ वातावरण होत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surrender To The Low-Abiding Nature, The Scorching Heat On The Streets