
गुरुजींकडून विद्यार्थ्यांना पोहण्याचे धडे...
केळघर : खर तर पोहणे हा उत्तम व्यायाम मानला जातो. निरोगी आरोग्यासाठी पोहण्याचा व्यायाम उपयुक्त समजला जातो. शहरांच्या मानाने ग्रामीण भागात पोहण्याचे पुरेसे प्रशिक्षण मिळत नाही. ग्रामीण भागातील मुले विशेषतः मुलींना पोहता यावे यासाठी कसबे बामणोली (ता. जावळी) येथील मुख्याध्यापक दीपक भुजबळ हे गेल्या अनेक वर्षांपासून विशेष प्रशिक्षण देत आहेत. ग्रामीण व दुर्गम जावळी तालुक्यातील मुलींना पोहता यावे म्हणून शिवसागर जलाशयात ते स्वतः पोहणाऱ्या मुलांना-मुलींना स्वखर्चाने लाइफ जॅकेट देत आहेत.
त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बामणोली शाळेत बामणोली, पावशेवाडी, शेंबडी मजरे व देवाची, म्हावशी, सावरी येथील मुले शिक्षण घेण्यासाठी येतात. प्रसंगी विस्तीर्ण शिवसागर जलाशयातून प्रवास करून विद्यार्थांना शाळेत येतात. या परिसरातील मुले व मुलींना पोहता यावे म्हणून श्री. भुजबळ हे स्वतः त्यांना प्रशिक्षण देत आहेत. गाढवली शाळेत सेवा करताना श्री. भुजबळ यांनी गाढवली, दरे-तांब व सोनाडी येथील सर्व विद्यार्थ्यांना पोहायला शिकवले. स्वतः शिवसागर जलाशयात प्रशिक्षण देऊन त्यांनी शेकडो विद्यार्थांना पोहण्यात पारंगत केले आहे. पाण्यात असताना कोणतीही दुर्घटना घडल्यावर निदान स्वतःचा जीव वाचवता आला पाहिजे म्हणून मुलांना पोहता आलेच पाहिजे म्हणून भुजबळ गुरुजी हे शाळेतील विद्यार्थ्यांना पोहण्याचे धडे देत आहेत.
मूळचे सातारा तालुक्यातील कोंडवे या गावातील रहिवासी असलेल्या भुजबळ गुरुजींनी कोंडवे गावातही डॉल्फिन स्विमिंग क्लबच्या माध्यमातून मुला-मुलींना पोहण्याचे उत्तम प्रशिक्षण दिले आहे. आधुनिक काळात विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी भुजबळ गुरुजींची चाललेली ही धडपड कौतुकास्पद आहे.
दुर्घटनेत आपला जीव वाचण्यासाठी सर्वांना पोहता आले पाहिजे. विस्तीर्ण शिवसागर जलाशयात पोहण्याचा आनंद औरच आहे. या उपक्रमाला अनेकांनी विरोधदेखील केला. मात्र, खचून न जाता स्वतः शिवसागर जलाशयात विद्यार्थांना पोहण्याचे धडे दिल्याचे समाधान वाटते. यापुढेही हे काम जोमाने सुरू ठेवणार आहे.
- दीपक भुजबळ, मुख्याध्यापक, कसबे बामणोली (ता. जावळी)
Web Title: Swimming Lessons For Students From Headmaster Deepak Bhujbal Kelghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..